जळगाव- केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्या कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. खासगीकरणामुळे रेल्वे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाईल. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने खासगीकरण थांबवावे, अन्यथा देशभरात एकही रेल्वे चालू देणार नाही, असा इशारा रेल्वेच्या नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे (NRMU) महाराष्ट्र आणि गोव्याचे महामंत्री वेणू नायर यांनी दिला आहे.
रेल्वेचे खाजगीकरण होऊ देणार नाही हेही वाचा-देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्याला धक्काबुक्की
रेल्वेच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी संघटनांशी चर्चा करण्यासाठी सुरू असलेल्या दौऱ्यात सोमवारी रात्री उशिरा वेणू नायर जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे स्थानकावर आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी रेल्वेच्या खासगीकरणाच्या संदर्भात आपली भूमिका मांडली. नायर यांचे रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी तसेच रेल्वेच्या नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
यानंतर पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, रेल्वेचे खासगीकरण म्हणजे सर्वसामान्य जनतेवर मोठा अन्याय आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून आज रेल्वेकडून अनेक सोयीसुविधा दिल्या जात आहेत. मुखत्त्वे करून ज्येष्ठ नागरिक तसेच अंध-अपंगांना उत्तम सुविधा मिळत आहेत. मात्र, खासगीकरणामुळे या सुविधा बंद होण्याची भीती वाटते. खासगीकरणामुळे रेल्वेचे भाडे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना एकाधिकारशाहीला सामोरे जावे लागेल. हे होऊ नये म्हणून आम्ही खासगीकरणाच्या विरोधात आहोत. केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आम्ही शक्य ते प्रयत्न करत आहोत. सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही तर देशभरात एकही विभागात रेल्वे चालू देणार नाहीत, असा इशारा यावेळी वेणू नायर यांनी बोलताना दिला.
नायर यांच्या स्वागतावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायर यांच्या स्वागतानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या खासगीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने आपला निर्णय बदलला नाही तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला.