जळगाव - चांगल्या पोलीस ठाण्यात बदली व्हावी, म्हणून बदलीसाठी लागणारे १५ लाख रुपये माहेरुन आणावे, या मागणीसाठी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. किशोर वानखेडे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते अकोला येथील डाबकी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
१५ लाख रुपयांसाठी पत्नीचा छळ; वरिष्ठ पोलीस अधिकारी पतीविरुद्ध गुन्हा दाखल किशोर वानखेडे यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नी योगिता यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. नाशिक येथील सिडको चाणक्य नगरातील रहिवासी योगिता यांचे २०११ मध्ये अमळनेर येथील किशोर वानखेडे यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्नाच्या वेळी योगिता यांच्या कुटुंबीयांनी ८ लाख २५ हजार रुपये हुंडा आणि लग्न असा एकूण १५ लाख रुपयांचा खर्च केला. लग्नानंतर पतीची पहिली नेमणूक पुणे येथे झाली. यानंतर नाशिक, बुलढाणा याठिकाणी त्यांची बदली झाली. योगिता यांना एक मुलगी आणि मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. मुलगी एंजल ही सात वर्ष आणि मुलगा प्रिन्स तीन वर्षाचा आहे.
हेही वाचा -धक्कादायक! मुलीने वसतिगृहाच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म
ऑफिसमध्ये त्रास होत असल्याने पती किशोर हे योगिता यांना 'तू माझ्यासाठी काही पण कर' असे सांगून सतत मारहाण आणि शिवीगाळ करायचे. २२ जुलै २०१९ रोजी देखील किरकोळ कारणावरुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. यानंतर चांगल्या पोलीस ठाण्यात बदलीसाठी माहेरुन १५ लाख रुपये घेवून ये, असे सांगत मारहाण व शिवीगाळ करायचे. या त्रासाला कंटाळून योगिता या त्यांची आजी आणि दोन्ही मुलांसह जळगावात विभक्त राहत आहेत. वेगळे निघाल्यावर पतीने योगिता यांचे २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिनेही काढून घेतले. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली होती. अखेर योगिता यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन किशोर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला देखील तडा गेला आहे. जिल्हापेठ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्याप संशयित किशोर वानखेडे यांना पोलिसांनी अटक केलेली नाही.