महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात कोरोनाबाधित मृतांची विल्हेवाट लावताना अक्षम्य निष्काळजीपणा - who guidelines

प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहातून पाणी बाहेर पडत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. एकूणच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 'डब्ल्यूएचओ'च्या सर्व गाईडलाईन्स धाब्यावर ठेवत मृतांची विल्हेवाट लावल्याचे दिसत आहे.

जळगावात कोरोनाबाधित मृतांची विल्हेवाट लावताना अक्षम्य निष्काळजीपणा

By

Published : May 23, 2020, 7:37 PM IST

जळगाव -जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना त्रिस्तरीय मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, असे असताना जळगावात याउलट अतिशय धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. जळगावातील नेरीनाका स्मशानभूमीतील एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पीपीई कीट परिधान केलेले दोन सहायक रुग्णवाहिकेमधून मृतदेह खाली उतरवताना या व्हिडिओमध्ये दिसत असून संबंधित मृतदेह हा अर्धवट खुला आहे. प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहातून पाणी बाहेर पडत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. एकूणच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 'डब्ल्यूएचओ'च्या सर्व गाईडलाईन्स धाब्यावर ठेवत मृतांची विल्हेवाट लावल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला आलेल्या कर्मचाऱ्यांचे पीपीई कीट स्मशानभूमीतचं फेकून दिल्याचे उघड झाले होते. यावर पडदा पडत नाही तोवर जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह महापालिका प्रशासनाच्या या दुसऱ्या भोंगळ कारभाराचा धक्कादायक नमुना समोर आलेला आहे. दरम्यान, याच नेरीनाका स्मशानभूमीत शहरातील अन्य मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेहासोबत येणाऱ्यांना या धक्कादायक प्रकारामुळे धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराचे एक ना अनेक प्रकारे वाभाडे निघत आहेत. अधिष्ठाता आणि शल्यचिकित्सक यांच्या आपापसातील वादातून नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर सोडले जात आहे. नुकतीच शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांची उचलबांगडी करीत त्यांच्या जागी कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. मनीषा गजभिये यांची नियुक्ती केलेली आहे. डॉ. गजभिये या तरी ही परिस्थिती सुधारतील, अशी अपेक्षा आता नागरिकांना आहे.

दरम्यान, या प्रकारासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मी संबंधित यंत्रणेला काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेले नियम पाळण्याचे देखील सूचित केल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे असा हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details