जळगाव - ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरासह परिसरात बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुर पंपींग स्टेशनचा वीज पुरवठा खंडित झाल्याने जळगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे रोटेशन महापालिका प्रशासनाने एक दिवस पुढे ढकलले आहे.
'निसर्ग' चक्रीवादळाचा फटका; जळगावातील पाणीपुरवठा विस्कळीत - water supply stopped in jalgaon
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वारे आणि पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जळगाव शहरातील काही भागात पाणी पुरवठा झाला नाही. या भागातील पाणी पुरवठा आता गुरुवारी होणार आहे. तसेच ४ व ५ रोजी होणारा पाणीपुरवठा ५ व ६ रोजी होणार आहे.

जळगाव शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या वाघुर रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथील ५०० अश्वशक्तीच्या विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा २ जून रोजी पाऊस व वादळामुळे सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत खंडित झाला होता. त्यानंतर पुन्हा मंगळवारी मध्यरात्री २.३० वाजेपासून पाऊस व वादळामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर, ३ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित असल्याने उमाळा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी साठवण टाकीमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी भरणा झालेला नाही. त्यामुळे शहरातील टाकीमध्ये शिल्लक असलेल्या पाण्यातून जळगाव शहरातील काही भागात ३ जून रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत पाणी पुरवठा करण्यात आला.
वाघुर वॉटर रॉ वॉटर पंपींग येथील विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा पाऊस व वादळामुळे खंडित झाल्याने शहरातील टाकीमध्ये पुर्ण क्षमतेने पाणी भरणा झालेला नाही. जळगाव जिल्ह्यात देखील चक्रीवादळामुळे ४ रोजी सर्तकतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याने बुधवारी ज्या भागात पाणीपुरवठा झालेला नाही, त्या भागातील पाणी पुरवठा गुरुवारी होणार आहे. तसेच ४ व ५ रोजी होणारा पाणीपुरवठा ५ व ६ रोजी होणार आहे.