जळगाव -जगातील 192पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाचे संकट उद्भवले आहे. या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. पक्ष, जात, धर्म हा विषय याठिकाणी नाही. त्यामुळे याबाबत राजकारण करणे चुकीचे आहे. कोरोनाबाबत राजकारण करण्यापेक्षा भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना 'क्वारंटाईन' का केले? याचं उत्तर द्यावं, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला चिमटा काढला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीसाठी गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या राजकीय भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत चिमटे काढले.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, आज कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. पक्ष, जात, धर्म हा विषय याठिकाणी नाही. कोरोना संकट हाच विषय महत्त्वाचा आहे. भाजपने अशावेळी आंदोलन करण्यापेक्षा जनतेची सेवा करावी. आंदोलन करायचेच असेल तर कोरोनाचे संकट दूर झाल्यावर निश्चितच जनतेच्या प्रश्नांसाठी, शेतकऱ्यांच्या अडचणींच्या बाबतीत करावे. एका सक्षम विरोधी पक्षाचे ते कर्तव्यच आहे. पण आता अशा संकटाच्या काळात राजकारण करत आंदोलन करणे चुकीचे ठरेल. या आंदोलनाचे वळण वेगळ्या दिशेने जाईल. त्यामुळे भाजपने आंदोलन करू नये. त्यापेक्षा कोरोनाग्रस्तांना मदत करावी, असे गुलाबराव पाटील म्हणाले.