जळगाव- खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या जळगाव तालुक्यातील आसोदा गावात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते. दिवस उजाडला की पाण्यासाठी शोधाशोध सुरू होते.
शाळकरी मुलांनाही डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागत आहे. पाण्यावाचून आबालवृद्धांचे हाल होत आहेत. गुरांच्या पाण्याचा प्रश्नही कठीण झाला आहे. विशेष म्हणजे, आसोदा गावापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या तापी नदीवर शेळगाव मध्यम प्रकल्प आहे. परंतु, तो अपूर्ण असल्याने आसोदावासीयांची अवस्था 'धरण उशाला तरीही कोरड घशाला' अशी झाली आहे.
आपल्या खान्देशी बोलीभाषेतील ओव्यांनी संपूर्ण जगाला जीवनमूल्यांची ओळख करून देणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरींमुळे आसोदा गावाला ऐतिहासिक महत्व आहे. परंतु, येथील ग्रामस्थांना मूलभूत सुविधांची प्रतीक्षा आहे. सुमारे 35 हजार लोकसंख्या असलेल्या आसोदा गावाला गेल्या 25 ते 30 वर्षांपासून पाणीटंचाई भासत आहे. पाणीटंचाई दूर व्हावी, म्हणून राजकारण्यांनी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. आजही आसोदेकरांची सकाळ पाण्याच्या शोधातच होते. हंडाभर पाणी मिळावे म्हणून महिलांना भर उन्हात पायपीट करावी लागते. यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने विहिरी, कूपनलिका असे पाण्याचे स्त्रोत जानेवारीतच आटले. त्यामुळे गावात 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यातही विद्युत पंप जळाला किंवा अन्य काही व्यत्यय आला तर महिनाभर नळांना पाणी येत नाही.
आसोदा गावाला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा म्हणून ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी शासनाच्या माध्यमातून 2012 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजना राबवली. मात्र, 8 वर्षांचा कालावधी उलटूनही ही योजना पूर्ण झालेली नाही. योजनेच्या ठेकेदाराने चालढकल केल्याने आसोदेकर पाण्यापासून वंचितच आहेत. 2012 मध्ये तेव्हाच्या लोकसंख्येला गृहीत धरून सुमारे 4 कोटी 95 लाखांची राष्ट्रीय पेयजल योजना आखली होती. आतापर्यंत ही योजना पूर्ण झालेली नाही. मध्यंतरी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केल्याने ठेकेदाराने कामाला सुरुवात केली. सध्या योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे. गेल्या 8 वर्षात गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एवढ्या लोकसंख्येला राष्ट्रीय पेयजल योजना पुरेशी होणार नसल्याने शासनाने ही योजना ताब्यात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.