जळगाव - अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प गेल्या 20 वर्षांपासून पुरेशा निधी अभावी रखडला आहे. शासनाची अनास्था तसेच लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. या बाबीचा निषेध नोंदविण्यासाठी पाडळसे धरण जनआंदोलन समितीकडून धरणस्थळी जलसत्याग्रह करण्यात आला.
पाडळसे धरणाच्या मागणीसाठी जलसत्याग्रह - shivjaynti
१९ फेब्रुवारीला शिवजयंतीपासून पाडळसे धरण जनआंदोलन समितीने सलग १२ दिवस साखळी उपोषण व जेलभरो आंदोलन देखील केले होते. मात्र, तरी शासनाने प्रकल्पासाठी निधी वाढवून देण्याऐवजी निधी कमी करून तालुक्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली.
या प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून घ्यावा व प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली म्हणून वर्षभरापूर्वी तालुक्यातील नागरिकांनी मूकमोर्चा काढला होता. त्यानंतर १९ फेब्रुवारीला शिवजयंतीपासून पाडळसे धरण जनआंदोलन समितीने सलग १२ दिवस साखळी उपोषण व जेलभरो आंदोलन देखील केले होते. मात्र, तरी शासनाने प्रकल्पासाठी निधी वाढवून देण्याऐवजी निधी कमी करून तालुक्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली.
या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी जलसत्याग्रह केला. तापी नदीच्या पात्रातील पाण्यात उतरून शेकडो आंदोलनकर्त्यांनी 'निष्क्रिय पालकमंत्री, जलसंपदा आणि आमदारांचा धिक्कार असो' अशी घोषणाबाजी करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
आंदोलकांशी चर्चा न करताच अधिकारी माघारी-
पाडळसे प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. परंतु, त्या आंदोलकांशी चर्चा न करताच माघारी परत गेल्या. त्यामुळे आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. शासनाने या प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून काम त्वरित पूर्ण केले नाही तर, भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.