महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव : कोरोना रुग्णांच्या सुविधेसाठी वॉररुम स्थापण, कोरोना अहवाल तात्काळ प्राप्त होण्यास मदत - corona cases in jalgaon

कोरोना रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी अल्पबचत भवनात वॉररूम स्थापन करण्यात आली आहे. इन्सिडेंट कमांडर गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली या वॉररूममध्ये दोन शिफ्टमध्ये सुमारे ४५ अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. वॉररूममध्ये पॉझिटिव्ह रुग्णांसह इतर नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येत आहे.

immediate corona report in jalgaon
जळगावात वॉररुमची स्थापना

By

Published : Jun 9, 2020, 6:44 PM IST

जळगाव- कोरोना रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी अल्पबचत भवनात वॉररूम स्थापन करण्यात आली आहे. या वॉररूममधील टोल फ्री व दूरध्वनी क्रमांकावर संशयितांचे प्रलंबित अहवाल, रुग्णवाहिका व संशयित रुग्णांबाबतच्या आतापर्यंत १२ तक्रारी करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात ही वॉररूम कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

इन्सिडेंट कमांडर गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली या वॉररूममध्ये दोन शिफ्टमध्ये सुमारे ४५ अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. वॉररूममध्ये पॉझिटिव्ह रुग्णांसह इतर नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येत आहे. वॉररूममधील टोल फ्री क्रमांकावर आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या स्वॅबचे अहवाल प्रलंबित असल्याच्या तक्रारी, रुग्णालयात जाण्यासाठी, येण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यासंबंधी तसेच एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची काही लक्षणे असल्यास फोन करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यात संशयित रुग्णांचे अहवाल सात ते आठ दिवस प्रलंबित राहात होते. त्यामुळे, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठक घेतली होती. त्या अनुषंगाने संशयित रुग्णांचे अहवाल २४ ते ४८ तासांच्या आत मिळालेच पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. वॉररूममधून प्रलंबित अहवालांबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे, अहवाल रखडण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

जिल्ह्यातील अहवाल प्रलंबित राहाण्याचे प्रमाण घटले -

जळगाव जिल्ह्यातील रुग्णांचे अहवाल प्रलंबित राहाण्याचे प्रमाण सात दिवसांवरून ३६ तासांवर आले आहे. त्यामुळे, आरोग्य यंत्रणेच्या कामाला सध्या गती आली आहे. तसेच रुग्णांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांची ऑक्सिजन लेवल व इतर तपासणीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात येणार आहे. त्यानुसार नियोजन सुरू झाले असल्याचे इन्सिडेंट कमांडर गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details