जळगाव :'रक्ताचे पाणी करून संसार उभा केला होता. आता कुठे चांगले दिवस आले होते. पण अतिवृष्टीमुळे डोंगरी नदीला पूर आला आणि आमचं घर-दार, पशुधन वाहून गेलं. पाणी प्यायला साधा एक ग्लासही उरलेला नाही. अंगावरचे कपडे तेवढे उरलेत. आता पुढे कसे जगायचे? हा खरा प्रश्न आहे. या पुराने तर आमचे सर्वस्व हिरावून नेलं आहे', या भावना आहेत; विश्वजित दौलतराव बागुल यांच्या... डोंगरी नदीला आलेल्या पुरात त्यांचे घर-दार वाहून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. 'त्या' काळरात्रीचा थरार 'ईटीव्ही भारत'कडे कथन करताना बागुल कुटुंबीयांना गहिवरून आले.
घर-दार, शेती सगळं पाण्यात
विश्वजित बागुल (वय 38 वर्षे) हे चाळीसगाव तालुक्यातील वाकडी गावचे रहिवासी. आई लिलाबाई, पत्नी अनिता आणि भूमिका व दीक्षा यांच्यासोबत ते राहतात. शेती आणि कृषी केंद्र चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी (30 ऑगस्ट) मध्यरात्रीनंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील तितूर व डोंगरी नद्यांना पूर आला. डोंगरी नदीला आलेल्या पुरात त्यांचे संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. तर घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेलंय. अंगावर कपडे तेवढे उरलेत. दैव बलवत्तर म्हणून बागुल कुटुंबीयांचा जीव बचावला आहे. पण सर्वस्व हिरावल्याने आता पुढे काय? हा एकच गहन प्रश्न त्यांच्यासमोर आहे. काही तासांपूर्वी दिमाखात उभे असलेले, छानशी रंगरंगोटी केलेले बागुल कुटुंबीयांचे दोन रुमचे टुमदार घर आज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आहे. हे घर कोसळलेले नाही तर बागुल कुटुंबीयांचे स्वप्नच विखरून पडलंय. त्यांची शेतीही पुरात उद्ध्वस्त झाली आहे.
'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
सोमवारी रात्री अनुभवलेला थरार कथन करताना विश्वजित बागुल यांनी सांगितले, की 'सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे मी कृषी केंद्राचे काम आटोपून घरी आलो. कुटुंबीयांसोबत जेवण केले. त्यानंतर मी मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने काही पैसे दुसऱ्याला पाठवले. बाहेर पाऊस सुरू असल्याने रात्री दीड वाजेपर्यंत झोप आली नव्हती. पण नंतर केव्हा डोळा लागला कळले नाही. त्यानंतर माझ्या डोक्याजवळ ठेवलेल्या मोबाईलवर लागोपाठ 3 ते 4 मेसेज आले. त्यामुळे मला जाग आली. तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते. बाहेर नदीच्या पाण्याचा जोरात खळखळाट सुरू होता. तो आवाज ऐकून मी घराबाहेर आलो. पाहिले तर घराच्या ओट्यापर्यंत पाणी आले होते. ते पाहून मी घाबरलो. घरात येऊन पत्नी, दोन्ही मुली, भाचा भूषण आणि आईला उठवले. नदीचे पाणी घरात घुसले म्हणून आपण बाहेर पडू, असे त्यांना सांगितले. पण ते नकार देत होते. याच वेळी घराच्या पुढच्या दरवाज्यातून पाणी आतमध्ये शिरले. आता घरात थांबलो तर मरून जाऊ, म्हणून मी सर्वांना मागच्या दरवाज्याने बाहेर काढले. मुसळधार पाऊस सुरू होता. तशा पावसातच आम्ही शेताच्या एका कोपऱ्याने बाहेरील रस्त्याकडे जाऊ लागलो. कंबरेपर्यंत पाणी असल्याने मी दोन्ही मुलींना खांद्यावर घेऊन पुढे चालत होतो. माझ्या मागे पत्नी, आई आणि भाचा चालत होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला. पाण्याचा जोर वाढतच होता. अशातच सकाळ झाली. त्यानंतर रोकडे गावातील दुधवाला मित्र आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. डोंगरी नदीला भला मोठा पूर आला होता. सकाळी 11 वाजेर्यंत नदीचा पूर ओसरलेला नव्हता. घराची काय परिस्थिती आहे, हे पाहण्यासाठी मी घराकडे आलो. पण दूरवरून नदीत वाहून आलेले साहित्य, कचरा, लाकडे यामुळे घर दिसतच नव्हतं. सायंकाळी पुराचा जोर ओसरल्यानंतर पाहिले तर जागेवर घर नव्हते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. संपूर्ण घर वाहून गेले होते'. एवढे बोलून विश्वजित बागुल शांत झाले. त्यांच्या तोंडून शब्दच निघत नव्हते.
10 शेळ्या, 2 बोकड, 1 गाय गेली वाहून -