जळगाव -कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन करणे जळगावातील भाजप नेत्यांना चांगलेच भोवले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात हजारोंच्या संख्येने शेतकरी आक्रोश मोर्चा काढून जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याने भाजप नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर भाजप नेते, पदाधिकाऱ्यांवर जळगावातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात काल, एक नोव्हेंबर रोजी दुपारी भाजपच्यावतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजप नेत्यांसह, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्हाभरातील शेतकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात कोरोनाच्या नियमावलीचा फज्जा उडाला होता. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले होते. याप्रकरणी पोलीस कर्मचारी राकेश दुसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाजप नेत्यांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.