महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात कडक निर्बंधांचे उल्लंघन, महापालिका प्रशासनाकडून 17 दुकाने सील - ताज्या बातम्या मराठीत

जळगावात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू असताना नागरिकांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिक तसेच किरकोळ विक्रेते, व्यापारी जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करत आहेत. मंगळवारी शहरातील सिंधी कॉलनी परिसरात 11 वाजेनंतर देखील दुकाने सुरू असल्याचे पहावयास मिळाले.

जळगावात कडक निर्बंधांचे उल्लंघन

By

Published : Apr 27, 2021, 7:26 PM IST

जळगाव -शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू असताना नागरिकांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिक तसेच किरकोळ विक्रेते, व्यापारी जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करत आहेत. मंगळवारी शहरातील सिंधी कॉलनी परिसरात 11 वाजेनंतर देखील दुकाने सुरू असल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे, सिंधी कॉलनीतील दुकानदारांसाठी जणू नियमच नाही, अशा तऱ्हेने या भागात व्यवसाय सुरू असल्याने मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने या भागात कारवाई सत्र राबवले. येथील 10 तर इतर भागातील 7 दुकानांवर कारवाई करत त्यांना सील ठोकण्यात आले.

दुकानदारांना प्रत्येकी 5 हजारांचा दंड

राज्य शासनाच्या नवीन नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवेतील दुकानांना व्यवसाय करण्यासाठी सकाळी 11 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. मात्र, शहरातील अनेक भागात 11 वाजेनंतर देखील दुकाने उघडीच असतात. तसेच या ठिकाणी ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. सिंधी कॉलनी परिसरातील दुकाने तर पूर्ण दिवसभर उघडी असल्याची माहिती मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार मंगळवारी 11 वाजेनंतर उपायुक्तांनी सिंधी कॉलनी भागात अचानक धडक दिली. यावेळी अनेक दुकाने उघडी असल्याचे आढळून आली. या प्रकाराचे छायाचित्रण मनपाच्या पथकाकडून करण्यात आले. पथक दाखल होताच दुकानदारांनी पटापट दुकाने लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने सर्व दुकानदारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच दुकाने देखील सील केली. शहरातील इतर भागात देखील अनेक दुकाने उघडी असल्याची माहिती मिळाल्यानंतर या दुकानदारांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात अनेक कपड्यांची दुकाने सुरू होती. या दुकानदारांवरही मनपाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली.

या 17 दुकानांवर करण्यात आली कारवाई
सिंधी कॉलनी भागातील सोना महाजन ट्रेडर्स, आदर्श हेअर आर्ट, संगीता लेडीज कॉर्नर, आशिष कलेक्शन, पवन मोबाईल, गोधडीवाला बुक डेपो, सुपर मेन्स पार्लर, रेणुकामाता इलेक्ट्रिकल्स कुलर्स, रामा गिफ्ट गॅलरी या दुकानांसह गोपाल ट्रेडर्स, जगताप मेटल्स, मकरा केमिकल, मोहीस सहरी, इब्राहिम अँड सन्स ही दुकाने उपायुक्त संतोष वाहुळे व त्यांच्या पथकातील संजय ठाकूर, सुनील पवार, किशोर सोनवणे, नाना कोळी, नितीन भालेराव, राहुल कापरे व सलमान मिस्त्री यांनी सील केली.

भाजीपाला विक्रेत्यांवरही कारवाई
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील भाजीपाला विक्रेत्यांनी पुन्हा शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरासह मिळेल त्या ठिकाणी व्यवसाय थाटण्यास सुरुवात केली होती. याबाबत महापालिकेच्या पथकाने भाजीपाला विक्रेत्यांना सूचना करून देखील मंगळवारी नेहमीप्रमाणे व्यवसाय सुरूच असल्याने अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून 44 भाजीपाला विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्यात आली. या विक्रेत्यांकडून तब्बल 4 ट्रॅक्टर भरून भाजीपाला जप्त करण्यात आला. या कारवाईदरम्यान अनेक विक्रेते व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. बजरंग बोगदा परिसरात कारवाईदरम्यान विक्रेते व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊन काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, महापालिकेच्या पथकाने अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करत मोठा माल जप्त केला आहे. कडक निर्बंधांच्या काळात अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून एकाच दिवसात आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

हेही वाचा -राज्यात मोफत लसीकरणाचा निर्णय कॅबिनेट बैठकीनंतर - उपमुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details