महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात 20 हजारांपेक्षा अधिक व्यक्तींकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन; 63 लाखांचा दंड वसूल - Corona rules in Jalgaon

जिल्ह्यात कोरोनाचा साखळी खंडित करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नियमावली ठरवली आहे. मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडी ठेवणे, गर्दी करणे, कोविडच्या उपाययोजना न करणे आदिंसह इतर कारणांसाठी दंडात्मक कारवाईचे निर्देश पोलीस, महापालिका व नगरपालिका प्रशासनास दिले आहेत. असे असूनही काही नागरिक व आस्थापना कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक करावाई करण्यात येत आहे.

पोलिसांची कारवाई
पोलिसांची कारवाई

By

Published : Apr 21, 2021, 6:47 PM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कडक निर्बंध लागू केले असून नागरिकांसाठी नियमावलीही जाहीर केली आहे. तरीही काही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने पोलीस व नगरपालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 20 हजार 268 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून 63 लाख 6 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय 574 व्यक्ती व संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर 23 प्रतिष्ठानेही सील करण्यात आली आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा साखळी खंडित करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नियमावली ठरवली आहे. मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडी ठेवणे, गर्दी करणे, कोविडच्या उपाययोजना न करणे आदिंसह इतर कारणांसाठी दंडात्मक कारवाईचे निर्देश पोलीस, महापालिका व नगरपालिका प्रशासनास दिले आहेत. असे असूनही काही नागरिक व आस्थापना कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक करावाई करण्यात येत आहे.

19 हजार लोकांवर कारवाई

जिल्ह्यात आतापर्यंत मास्क न लावणाऱ्या 19 हजार 77 व्यक्तींकडून 53 लाख 83 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 15 व्यक्तींकडून 69 हजार 800 रुपये दंड केला आहे. विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या 561 व्यक्तींकडून 2 लाख 17 हजार 400 रुपये दंड वसूल केला असून 531 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या 241 प्रतिष्ठानांना यामध्ये मंगल कार्यालये, नाट्यगृह, हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह यांना 4 लाख 80 हजार 300 रुपये दंड करुन 43 प्रतिष्ठानांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर 23 प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या 374 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना 1 लाख 55 हजार 200 रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

कारवाई करण्यात पोलीस प्रशासन आघाडीवर

जिल्ह्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यामध्ये पोलीस प्रशासन आघाडीवर आहे. पोलीस दलाने मास्क न वापरणाऱ्या 12 हजार 603 व्यक्तींकडून 26 लाख 81 हजार 200 रुपयांचा, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या 531 व्यक्तींकडून 1 लाख 81 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 531 व्यक्तींवर गुन्हेही दाखल केले आहेत. तसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणारे 38 प्रतिष्ठानांकडून 69 हजार दंड करुन 38 प्रतिष्ठानांवर गुन्हे दाखल केले आहेत.

महापालिका हद्दीतही कारवाई सुरू

जळगाव महापालिका हद्दीत आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकासह इतर पथके कार्यरत आहेत. या पथकांनी मास्क न लावणाऱ्या 1 हजार 25 व्यक्तींकडून 4 लाख 88 हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 8 व्यक्तींकडून 35 हजार रुपये, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या 5 व्यक्तींकडून 2 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे. तसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या 8 प्रतिष्ठानांना 35 हजार रुपये दंड करुन 5 प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या 6 वाहनांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नगरपालिकांनाही कारवाईचे निर्देश

जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश दिघे यांच्यासह सर्व मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथके कार्यरत असून त्यांनी मास्क न लावणाऱ्या 5 हजार 449 व्यक्तींकडून 22 लाख 14 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 7 व्यक्तींकडून 34 हजार 800 रुपये, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या 25 व्यक्तींकडून 33 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या 195 प्रतिष्ठानांना 3 लाख 76 हजार 300 रुपये दंड करुन 5 प्रतिष्ठानांवर गुन्हे दाखल केले आहेत तर 18 प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या 368 वाहनांवर कारवाई करुन, 1 लाख 45 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details