महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना नियमांचा भंग केल्याने जळगावात मंगल कार्यालयांना ठोकले टाळे - कोरोना जळगाव

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण समोर येत असल्याने महापालिका प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आले आहे.

कोरोना नियमांचा भंग केल्याने जळगावात मंगल कार्यालयांना ठोकले टाळे
कोरोना नियमांचा भंग केल्याने जळगावात मंगल कार्यालयांना ठोकले टाळे

By

Published : Feb 21, 2021, 5:15 PM IST

जळगाव - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण समोर येत असल्याने महापालिका प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आले आहे. रविवारी (21 फेब्रुवारी) या सत्रातील मोठी लग्नतिथी असल्याने महापालिका प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. प्रशासनाने राज्य शासनाने आखून दिलेल्या कोरोना नियमावलीचा भंग करणाऱ्या मंगल कार्यालयांना टाळे ठोकले. या कारवाईवेळी महापालिकेच्या पथकाने मंगल कार्यालयातील वऱ्हाडी मंडळीला देखील बाहेर काढले.

संतोष वाहुळे, महापालिका उपायुक्त

जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. चालू आठवड्यात दररोज 100 पेक्षा अधिक नव्या कोरोनाबधित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासनाने आता कारवाईचा पवित्रा घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे व गर्दी करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. रविवारी लग्नतिथी असल्याने मंगल कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने महापालिका प्रशासनाने मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके गठीत केली होती. उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभरात महापालिकेच्या पथकांनी शहरातील पाच ते सहा मंगल कार्यालयांना टाळे ठोकले.

या मंगल कार्यालयांवर झाली कारवाई-

महापालिका प्रशासनाच्या पथकांनी कारवाई केलेल्या मंगल कार्यालयांमध्ये, भुसावळ रस्त्यावरील कमल पराडाईज, पांडे डेअरी चौकातील दापोरेकर मंगल कार्यालय, पिंप्राळा रेल्वेगेट परिसरातील यश लॉन्स, एमआयडीसीतील बालाणी लॉन्स, खेडी रस्त्यावरील मिराई लॉन्स, आकाशवाणी चौफुली परिसरातील लाडवंजारी मंगल कार्यालय, अशा अनेक मंगल कार्यालयांचा समावेश होता.

मंगल कार्यालयांमध्ये नियमावलीचे पालन होत नसल्याच्या तक्रारी-

या कारवाईबाबत बोलताना महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभांना जिल्हा प्रशासनासह पोलीस व महापालिका प्रशासनाने एक नियमावली घालून दिली आहे. त्यात लग्न समारंभात 50 पेक्षा अधिक लोकांची गर्दी नको, प्रत्येकाने मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे, अशी बंधने घालून दिली आहे. ही नियमावली पाळणे आवश्यक आहे. परंतु, शहरातील मंगल कार्यालयांमध्ये नियमावलीचे पालन होत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार कारवाई केली जात आहे. मंगल कार्यालयाला आम्ही टाळे ठोकले आहेत. आता पोलीस प्रशासनाकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे उपायुक्त वाहुळे यांनी सांगितले.

लग्नकार्यात कारवाईच्या अक्षदा!-

दरम्यान, काही मंगल कार्यालयांमध्ये लग्न लागण्याची तयारी सुरू असतानाच, कारवाईसाठी महापालिका प्रशासनाच्या पथकासह पोलीस एकत्रितरीत्या दाखल झाले. त्यामुळे संबंधितांची चांगलीच गाळण उडाली. कारवाईसाठी आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांनी वर्‍हाडी मंडळीला बाहेर काढत कारवाईची प्रक्रिया पूर्ण केली.

जिल्हाधिकारी देखील रस्त्यावर-

एकीकडे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मंगल कार्यालयांकडून नियमावलीचा भंग होत आहे. त्यामुळे आज कारवाईसाठी तसेच कारवाईच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे देखील प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी काही ठिकाणी भेटी देऊन कारवाईच्या सूचना केल्या. कोणत्याही परिस्थितीत नियमांचे पालन झालेच पाहिजे, असा आग्रह जिल्हाधिकाऱ्यांनी धरला.

हेही वाचा-पुण्यात दुर्दैवी घटना; ओढ्यात बुडाल्याने आई-वडिलांसह तीन मुलींचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details