जळगाव - जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यात पितृपक्षही सुरू असल्यामुळे भाज्यांची मागणी वाढली आहे. परिणामी पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव कडाडले आहेत.
पावसामुळे भाज्यांची आवक घटली पितृपक्षात श्राद्धसाठी लागणाऱ्या भाज्यांची मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. शहरातील गणेश कॉलनी रस्ता, महाबळ रस्ता, गिरणा टाकी चौक याठिकाणी भाजी बाजार भरतो. यासर्व ठिकाणी भाज्यांचे दर वाढल्याचे चित्र आहे. जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक ६० टक्क्यांनी कमी झाली आहे.
जळगावच्या बाजारात परराज्यातूनही भाजीपाल्याची आवक होते. मात्र, ही आवकदेखील सध्या घटली आहे. आवक कमी असल्याने जळगावकरांना भाजी खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. एरवी २५ रुपये किलोने विकली जाणारी भरीताची वांगी आता ५० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत. लहान वांगीदेखील ४५ रुपये प्रतिकिलो दराने बाजारात आहेत. मेथी, पालक यासारख्या पालेभाज्यांचेही दरही वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
जळगावातील भाज्यांचे दर -
- मेथी : ४० ते ५० रुपये प्रतिकिलो
- कोथिंबीर : ८० ते ९० रुपये प्रतिकिलो
- बटाटे : ४० ते ५० रुपये प्रतिकिलो
- कांदे : ५० ते ६० रुपये प्रतिकिलो
- टोमॅटो : ६० ते ७० रुपये प्रतिकिलो