जळगाव - जिल्ह्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासह शेतकऱ्यांच्या देणीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी (आज) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कारखान्याचे कामगार तसेच काही शेतकरी सहभागी झाले होते.
फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना गेल्या दोन वर्षांपासून तोट्यामुळे बंद झाला आहे. कामगारांचे वेतन, शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम तसेच बँकांची अन्य देणी मिळून कारखान्याकडे सुमारे 98 कोटी रुपयांचे देणे बाकी आहे. राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत होत नसल्याने कारखाना अडचणीत आला आहे. दरम्यान, कामगारांचे वेतन व पीएफ, सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या ग्रॅज्युईटीची रक्कम अशी सुमारे 20 कोटी रुपयांची तसेच शेतकऱ्यांच्या एफआरपीची सुमारे 16 कोटी रुपयांची देणी बाकी आहे. राज्य सरकारसह कारखान्याच्या संचालक मंडळाकडून या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी काहीही प्रयत्न होत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी (आज) कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांच्या घरावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, प्रमोद इंगळे, यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे, रावेर तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे आदींच्या नेतृत्त्वात हे आंदोलन झाले.
आंदोलनाबाबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे म्हणाले की, मधुकर सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून चुकीच्या धोरणामुळे अडचणीत आला आहे. येथील कामगारांचे 50 महिन्यांचे वेतन, पीएफची रक्कम, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटीची रक्कम मिळालेली नाही. शेतकऱ्यांची देणीही रखडली आहे. ही देणी चुकवावी म्हणून संचालक मंडळाने प्रयत्न करावेत, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही. आता कोरोनामुळे कर्मचारी, शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांना हक्काची देणी मिळायला हवी. हा प्रश्न सोडवला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विनोद सोनवणे यांनी दिला आहे.
शेतकरी, कामगारांच्या हितासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील- शरद महाजन