जळगाव -दिवाळीच्या मंगलमय पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वात धनत्रयोदशी आणि पाडवा हे दोन्ही मुहूर्त सोने व चांदीच्या खरेदीसाठी महत्त्वाचे मुहूर्त मानले जातात. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने धनत्रयोदशीला सोने व चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा अपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. सराफ बाजारातील उलाढालीचा विचार केला तर गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोने व चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सोने व चांदीचे दर कमी असल्याने खरेदी वाढली आहे. त्यामुळे पाडव्यापर्यंत तेजी कायम असेल. तसेच पुढे लग्नसराई पण येत असल्याने सराफ बाजारातील उलाढाल वाढतच जाईल, असा अंदाज आहे.
'सुवर्णनगरी' जळगावात धनत्रयोदशीला सोने खरेदीचा अपूर्व उत्साह गेल्यावर्षीच्या तुलनेत आता ३ हजारांनी घसरले दर -
जळगाव सराफ बाजारात गेल्यावर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२० मध्ये सोन्याचे दर ५१ हजार २०० ते ५१ हजार ३०० असे होते. मात्र, यावर्षी सोन्याचे दर ४८ हजार ५०० ते ४८ हजार ३०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. १२ महिन्यांच्या कालावधीतील घसरणीचा ट्रेंड लक्षात घेतला, तर सोने सुमारे ३ हजार रुपयांनी कमी झाले आहे. हीच संधी साधून गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य नागरिक सोने खरेदीला महत्त्व देत आहेत. धनत्रयोदशी आणि पाडव्याच्या मुहूर्तावर विक्रमी खरेदी होईल, असे चित्र सराफ बाजारात दिसून येत आहे.
सोने खरेदीचा अपूर्व उत्साह धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर विक्रमी खरेदी-विक्रीचा अंदाज-
कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे गेल्यावर्षी सर्वच सणांची चमक फिकी होती. दिवाळीचा सणही त्याला अपवाद नव्हता. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने चांगले वातावरण आहे. राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्याने बाजारपेठ पूर्वपदावर आली आहे. सराफ बाजार आता पूर्वीच्या तुलनेत सावरला आहे. आता दिवाळीच्या मुहूर्तावर सोने व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहक देखील आतूर आहेत. धनत्रयोदशी आणि पाडव्याच्या मुहूर्तांवर यावर्षी विक्रमी सोने खरेदी होईल, असा सराफ व्यावसायिकांचा अंदाज आहे. आज धनत्रयोदशीला जळगाव सराफ बाजारात ५ ते ६ कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. धनत्रयोदशीला ग्राहक सोन्याचे दागिने, सोन्याचा तुकडा किंवा शिक्के खरेदीला पसंती देतात.
यंदा धनत्रयोदशीला सोने खरेदीत १५ ते २० टक्के वाढ अपेक्षित-
जळगाव सराफ बाजार असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड पुढे म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात बँकिंग यंत्रणेत रोकडतेचा प्रवाह चांगला आहे. बँकांचे व्याजदर देखील नीचांकी पातळीवर आहेत. विक्रमी तेजीनंतर सोन्यात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे यंदा धनत्रयोदशीसह पाडव्याच्या दिवशी सोने व चांदी खरेदी विक्रीचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय होण्याची शक्यता आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा धनत्रयोदशीला सोन्याच्या दागिन्यांची विक्री सुमारे १०० टक्के होईल. २०१९ च्या तुलनेत विचार करायचा झाला तर सोन्याचे दागिने विक्री आता १५ ते २० टक्क्यांनी वाढण्याची आशा आहे, असेही स्वरूपकुमार लुंकड यांनी सांगितले. कोरोना कमी झाल्यानंतर यावर्षी ग्राहकांनी दसरा व त्यानंतर गुरुपुष्यामृत योग मुहूर्तांवर सोने खरेदीला पसंती दिली. आता धनत्रयोदशी आणि पाडव्याला पण अशीच उलाढाल राहील, असेही त्यांनी सांगितले.
जळगावात 'असे' आहेत आजचे दर-
सोने व चांदीच्या दरांमध्ये सध्या घसरणीचा ट्रेंड अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने व चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी गुंतवणूकदारांसाठी चालून आलेली आहे. जळगाव सराफ बाजारात मंगळवारी सकाळी व्यवहारांना सुरुवात झाली, तेव्हा २४ कॅरेट सोन्याचे दर ४७ हजार ८०० ते ४७ हजार ९०० रुपये (३ टक्के जीएसटी वगळून) प्रतितोळा तर चांदीचे दर सुमारे ६७ हजार रुपये प्रतिकिलो असे नोंदवले गेले. आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक व्यवहारांची स्थिती आगामी काही दिवस अशीच कायम राहील, असा अंदाज असल्याने सोन्याचे दर एक ते दीड हजारांनी तर चांदीचे दरही दोन ते अडीच हजार रुपयांनी वर-खाली राहू शकतात, असाही सराफांचा अंदाज आहे.