जळगाव- भाजप सरकारच खऱ्या अर्थाने देशाचा विकास साधू शकतो, असा विश्वास सर्वसामान्या लोकांना आहे. त्यामुळे येत्या २३ मे रोजी केंद्रात आणि राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेत येईल. त्याचप्रमाणे जळगाव लोकसभेची जागा देखील भाजप कायम राखणार आहे, असा ठाम विश्वास जळगाव लोकसभेचे भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केला.
केंद्रासह राज्यात भाजप पुन्हा सत्तेत येणार; उन्मेष पाटलांना विश्वास
जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही जागा भाजप राखणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वामुळे पुन्हा एकदा केंद्रात तसेच राज्यात भाजपचे सरकार येईल, असेही उन्मेष पाटील म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वामुळे जगात भारताची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. गेल्या ५ वर्षांच्या काळात देशाने संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, परराष्ट्र नीती, दळणवळण यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सरकारने तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहचवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या साऱ्या गोष्टी मतदाराने मतदान करताना निश्चितच विचारात घेतल्या असतील, असे मानायला हरकत नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या ६० वर्षांच्या काळात जो बदल देशात झाला नाही, तो बदल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात झाल्याचे सर्वसामान्य नागरिकांनी अनुभवले आहे. आज आपल्या भारत देशाचे नाव जगातील प्रमुख महासत्ता असलेल्या राष्ट्रांसोबत घेतले जाते. हीच मोदी सरकारची मोठी उपलब्धी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली देश सुरक्षीत राहू शकतो आणि प्रगती करू शकतो, असा विश्वास सर्वसामान्य लोकांना आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा नेतृत्वाची संधी मिळेल, असे उन्मेष पाटील यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी विविध वृत्तसंस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यात जळगावची जागा पुन्हा भाजपला दाखवली आहे. ही बाब आमच्यासाठी चांगली आहे. मला खात्री आहे की जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही जागा भाजप राखणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वामुळे पुन्हा एकदा केंद्रात तसेच राज्यात भाजपचे सरकार येईल, असेही उन्मेष पाटील म्हणाले.