जळगाव- जळगाव लोकसभेसाठी भाजपने विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने भाजपत दोन गट पडले आहेत. त्यामुळे या गटबाजीचा फटका बसू नये, म्हणून भाजपने आता जळगावात उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. स्मिता वाघ यांच्याऐवजी भाजपचे चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता असून ते उद्या अर्ज दाखल करण्याची माहिती आहे.
भाजपचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचा पत्ता कापून भाजपने विद्यार्थीदशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सहभागी असलेल्या आमदार स्मिता वाघ यांना जळगावातून उमेदवारी दिली होती. त्यामुळे खासदार पाटील यांनी स्वकियांविरोधात बंडाची हाक दिली होती. ए. टी. पाटील यांच्या बंडाची धग शांत होत नाही तोच, अमळनेरचे भाजपचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनीदेखील समर्थक कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. काल त्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन जळगावात उमेदवार बदलून आपल्याला भाजपची उमेदवारी द्यावी, जर उमेदवार बदलला नाही तर मी अपक्ष निवडणूक लढणार, असा इशारा दिला होता.
त्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत घडामोडी वाढल्या होत्या. स्थानिक पातळीवर सुरू असलेली खदखद पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घेतली आहे. स्थानिक गटबाजीचा फटका पक्षाला बसू नये, म्हणून भाजपने आता जळगावात उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. स्मिता वाघ यांनी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपने अंतर्गत सर्वेक्षणही केले होते. त्यात वाघ यांच्याविषयी नकारात्मक अहवाल आल्याने पक्षाने त्यांचा पत्ता कापण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतदेखील यासंदर्भात खलबते सुरू होती. वाघ दाम्पत्याविषयी जिल्ह्यात प्रचंड नाराजी असल्याने पक्षाने हा निर्णय घेतला आहे.
चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील हे सामाजिक कार्याच्या माध्यमातून सक्रिय असताना भाजपकडून विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव देशमुख यांना पराभूत केले होते. तरुणांमध्ये ते लोकप्रिय असून त्यांचा जनसंपर्क पाहता भाजपने आता त्यांना लोकसभेचे तिकीट देऊ केले आहे. उन्मेष पाटील यांच्यासोबतच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांचेही नाव जळगावसाठी चर्चेत आहे. आता नेमके कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.