जळगाव -शहरातील गणपतीनगर, रामदास कॉलनी आणि ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर समाजकंटकांनी वाहने पेटवून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. तीनही घटनांमध्ये २ कार तसेच २ दुचाकी जळाल्या आहेत. या घटनेमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे पूर्ववैमनस्यातून आहे का? यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
जळगावात समाजकंटकांनी पेटवली वाहने, २ कार, २ दुचाकी जळाल्या - जळगावात वाहने जाळली
जळगाव शहरात रविवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी दोन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. वाहन पेटवल्याच्या घटना पूर्ववैमनस्य़ातून झाल्यात काय याचा शोध घेत आहेत.
पहिली घटना रविवारी मध्यरात्रीनंतर पावणेदोन वाजताच्या सुमारास गणपतीनगरातील शालिमार अपार्टमेंटमध्ये घडली. याठिकाणी राहणारे गिरीश बन्सीलाल मोतीरामाणी यांचे नातेवाईक भारत तलरेजा (रा. सिंधी कॉलनी, जळगाव) यांनी आपली कार (एमएच १९ सीयू ५५१५) लॉकडाऊनमुळे मोतीरामाणी यांच्याकडे दीड महिन्यांपासून लावलेली होती. रात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून त्यांची कार पेटवून दिली. पहिल्या प्रयत्नात कार पेटली नाही म्हणून संशयिताने कारजवळ येऊन पुन्हा पेट्रोल टाकून कार पेटवून देत मेन गेटमधून पळ काढला. बन्सीलाल मोतीरामाणी यांच्या घराच्या बाजूला राहणारे करण पोपली हे कुलरमध्ये पाणी टाकण्यासाठी उठले, तेव्हा कार पेटल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी कारला लागलेली आग विझविली. यात कारचे बरेच नुकसान झाले आहे. ही घटना अपार्टमेंटच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
दुसरी घटना, सागर पार्क मैदानाजवळ रामदास कॉलनीत घडली आहे. येथे राहणारे नीरज सुरेशचंद्र छाजेड यांच्या मालकीच्या दोन दुचाकी आहेत. रविवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी अपार्टमेंटमध्ये लावलेली दुचाकी (एमएच १९ बीझेड ६१८८) पेट्रोल टाकून पेटवून दिली. यात दुचाकी जळून खाक झाली, तर बाजूला उभी असलेली मोपेड (एमएच १९ एझेड १२३७) अर्धवट जळाली. हा प्रकार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वॉचमनच्या लक्षात आल्याने त्याने आरडाओरड केली. त्यानंतर काही नागरिकांनी तातडीने पाणी टाकून आग विझविली. मात्र, तोवर दुचाकी जळून नुकसान झाले होते. बाजूच्या अपार्टमेंटमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत संशयित कैद झाले आहेत.
तिसरी घटना ही ओंकारेश्वर मंदिराजवळ घडलीय. विधान परिषदेचे माजी आमदार गुरुमुख जगवानी यांच्या बंगल्याच्या बाजूला राहणारे सुबोध मोतीचंद बुंदेलखंडी यांची टोयोटा कार (एमएच १९ बीयू ७७४४) अपार्टमेंटच्या बाहेर पार्किंगमध्ये लावलेली होती. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी ही कार पेटवून दिली. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. मात्र, कार पूर्णपणे जळाली आहे.
या घटनेनंतर वाहन मालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनांमुळे पोलिसांच्या रात्र गस्तीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात समाजकंटक रात्रीच्या वेळी निर्धास्तपणे कसे फिरत होते? ते पोलिसांच्या नजरेस पडले नाहीत का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.