जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात जिल्हा प्रशासनाच्यावतीनेही जनजागृती करण्यात येत आहे. याचे फलीत म्हणून पाचोरा तालुक्यातील देशमुखवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुरेखा संजय महाले यांनी धान्य वाटप करण्यासाठी एक कल्पना अंमलात आणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टन्सिंग’चा अभिनव उपक्रम सर्वांसमोर ठेवला आहे.
सुरेखा महाले यांनी आपल्या दुकानात स्वस्त धान्य वाटप करण्यासाठी एक मोठे नरसाळे आणि स्वतंत्र पाईप ठेवला आहे. लाभार्थी दुकानात आल्यावर दुकानदार ई-पॉस मशिनद्वारे स्वत:चे आधार प्रमाणित करून लाभार्थ्यासमोर धान्य मोजतात. त्यानंतर लाभार्थ्याला पाईपच्या दुसऱ्या टोकाला पिशवी लावण्यास सांगितले जाते. लाभार्थींनी पाईपच्या दुसऱ्या टोकाला पिशवी लावल्यानंतर मोठ्या नरसाळ्यातून धान्य आपोआप लाभार्थीच्या पिशवीत पडते. यामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’ होत असून लाभार्थ्यांना उभे राहण्यासाठी ५ फूट अंतरावर चौकोन तयार करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी रांगेत या चौकोनातच उभे राहण्याच्या सूचनाही महाले यांनी सर्वांना दिल्या आहेत.
हेही वाचा -COVID -19 : धारावीत आढळला तिसरा रुग्ण, डॉक्टरला कोरोनाची लागण..