जळगाव - जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा जैवविविधता संपन्न आहेत. त्यात अनेक दुर्मिळ प्राणी व वनस्पती यांचा उत्कृष्ट अधिवास असून अनेकवेळा ही जंगले फक्त नकारात्मक बाबींसाठी चर्चिली जातात. पण हे जंगल खरतर 'ऑर्किड हॉटस्पॉट' आहे.
ऑर्किड्सचे जंगलातील अस्तित्व ऑर्किड्सचे जंगलातील अस्तित्व हे त्या जंगलाची गुणवत्ता ठरवण्यासाठी निदर्शक म्हणून वापरले जाते. एखाद्या जंगलात ऑर्किड्स असणे म्हणजे त्या जंगलाचे आरोग्य सुदृढ आहे याचे ते निदर्शक आहे. सातपुडा पर्वत रांगा या अशा अनेक दुर्मिळ ऑर्किड्सने संपन्न आहेत. यात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वनस्पती अभ्यासक राहुल सोनवणे व प्रसाद सोनवणे यांना अजून दोन आमरिंची भर पाडण्यात यश आले आहे. जिव्हा पुष्प व सुवर्ण शिखी या दोन आमरी तसेच Heterostemma dalzellii व Utricularia aurea (सोन जठरी) अशा एकूण चार वनस्पती जळगावच्या वनस्पती सूचित जोडण्यात राहुल सोनवणे व प्रसाद सोनवणे यांना यश आले आहे. यातील सोन जठरी ही कीटकभक्षी वनस्पती हतनूर धरण परिसरातून नोंदवली गेली.
सातपुड्यातील दुर्मिळ वनस्पती वैभव 1) Peristylus plantagineus जिव्हा पुष्प ही ऑर्किड कुळातील वनस्पती असून तिच्या फुलाची खालची पाकळी(लीप) जिभेसारखी दिसते म्हणून तिला जिव्हा पुष्प हे नाव. ही वनस्पती अधिवास संवेदनशील असून डोंगरउतारावर बांबुंच्या तसेच इतर वृक्षांच्या छायेत कुजणाऱ्या पालापाचोळा यांमध्ये ती वाढते. ही जमिनीवर वाढणारी आमरि असून ९० सेमी पर्यंत वाढते.
सातपुडा पर्वतांमध्ये जैवविविधता 2) Eulophia ochreata सुवर्णशीखी ही सुद्धा जमिनीवर वाढणारी ऑर्किड कुळातील वनस्पती असून पहिल्या पावसाबरोबर ही वाढायला लागते. पाने व फुले सोबतच येतात. डोंगर उतारांवर पाला पाचोळयात ही वनस्पती जून महिन्यात फुलते. हिला मराठीत पिवळा अमर कंद ही म्हणतात. या महत्त्वपूर्ण वनस्पती नोंदी जळगाव जिल्ह्याचे वनस्पती वैभव अधोरेखित करतात.
वनस्पती संबंधीचा शोधनिबंध नुकताच Ela Journal for Forestry and wildlife या विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाला. या संशोधन कार्यात त्यांना डॉ. आर.जी. खोसे, डॉ. मिलिंद सरदेसाई व डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अमन गुजर, गौरव शिंदे,संस्था अध्यक्ष रवींद्र फालक, रवींद्र सोनवणे, बाळकृष्ण देवरे, राजेंद्र नन्नवरे,भूषण चौधरी, चेतन भावसार यांचे सहकार्य लाभले.
सातपुड्यासह जळगाव वनक्षेत्रात अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी, पक्षी, आणि एकूणच जैवविविधतेतील अनेक दुर्मिळ घटकांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यात जळगांव आणि यावल वनविभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. डिगंबर पगार आणि संजयकुमार दहिवले यांच्या कार्यकाळात जळगांव, यावल वनक्षेत्रास भरभराटीने वेग घेतला. वन्यजीवचे वनाधिकारी अनिल अंजनकर, अश्विनी खोडपे, जितेंद्र गावंडे, अक्षय म्हेत्रे , धनंजय पवार आणि वनकर्मचारी वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. आमचे संशोधन वनविभागालाच समर्पित आहे.