जळगाव - लॉकडाऊन काळात रोजगार मिळववून देण्याच्या बहाण्याने सख्ख्या काकाने १४ वर्षीय अल्पवयीन पुतणीस जिल्ह्यातील पाचोरा शहरात आणले. यानंतर पैसे घेऊन मुलीचे नाशिक येथील तरुणाशी लग्न लावून दिले. याप्रकरणी काकासह अन्य सहा जणांवर अपहरण, अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली.
मध्यप्रदेशातील गोदरी (ता. किरनपुर, जि. बालाघाट) येथे राहणारी ही १४ वर्षीय मुलगी आई-वडिलांचे निधन झालेले असल्यामुळे आत्याकडे राहत होती. दरम्यान, त्याच गावात राहणाऱ्या काकाने लॉकडाऊन सुरू असताना मुलीस रोजगार मिळवून देण्याच्या बहाण्याने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आणले. काही दिवस पाचाेऱ्यात राहिल्यानंतर त्याने काही जणांच्या मदतीने नाशिक येथील एका तरुणासोबत तिचे लग्न लावून दिले. यापोटी काकाने संबधित तरुणाकडून पैसे देखील घेतले आहेत. यानंतर तरुणाने मुलीस नाशिक येथे घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर पीडित मुलगी आत्याला भेटण्याच्या बहाण्याने बालाघाट येथे गेली. तेथे तिने आपबीती सांगून बळजबरीने लग्न करून अत्याचार केल्याची तक्रार आत्याजवळ केली.