जळगाव - बॉलिवुडचे काही अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या मोबाईलवरील व्हाट्सअॅप चॅटवरून ड्रग्ज संदर्भात काही नावे निष्पन्न झाली आहेत. मात्र, फक्त व्हाट्सअॅप चॅट हा त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी सक्षम पुरावा होऊ शकत नाही. त्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) या प्रकरणाची पाळेमुळे शोधावीच लागतील, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभागाकडून तपास सुरू आहे. या तपासादरम्यान जया हिच्या व्हाट्सअप चॅटमध्ये मिळालेल्या माहितीवरून बॉलिवुडमधील काही अभिनेत्रींना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले आहे. यामध्ये रकुलप्रीत सिंग, फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा, अभिनेत्री सारा अली खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा समावेश आहे. या विषयावर बोलताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपले मत मांडले आहे. ते म्हणाले, की या प्रकरणात अभिनेता किंवा अभिनेत्रींचे मोबाईलवरील व्हाट्सअॅप चॅट सक्षम पुरावा ठरणार नाही. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सखोल तपास करावा लागणार आहे. संबंधित अभिनेते किंवा अभिनेत्री या कुणाकडून ड्रग्ज घेत होत्या, हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला पाहावे लागणार आहे.