जळगाव - ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांचे निधन ही निश्चितच मोठी दुःखद बाब आहे. पण त्यांच्या जाण्याने आज आपल्यातून कायद्याचा थोर अभ्यासक, विद्यार्थी हरपला आहे. त्यांच्या निधनाने फक्त वकील संघाचेच नाही तर आपल्या देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने मला व्यक्तीशः खूप दुःख झाले आहे, अशा भावना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा -असे वकील ज्यांनी इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांची केली वकिली; जेठमलानींनी लढलेले वादग्रस्त खटले
देशाचे माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जळगावात माध्यमांना प्रतिक्रिया देताना उज्ज्वल निकम यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. निकम यांनी सर्वोच्च न्यायालयात राम जेठमलानी यांच्या सोबत काही काळ काम केले आहे. त्यांच्यासोबत लढलेले खटले, व्यक्तिगत संबंध तसेच विविध आठवणींना यावेळी निकमांनी उजाळा दिला. निकम पुढे म्हणाले, राम जेठमलानी आणि माझा प्रत्यक्ष संबंध १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यावेळी आला. या खटल्यात मी विशेष सरकारी वकील म्हणून बाजू सांभाळत होतो तर जेठमलानी यांनी एका चित्रपट अभिनेत्याचे वकीलपत्र घेतले होते. त्या अभिनेत्याचा बचाव करताना त्यांनी प्रतिज्ञापत्रात न्यायालयात सादर केलेल्या काही बाबींचा अर्थ मी माझ्या बाजूने घेतला. त्यांची वक्तव्ये कशी त्यांच्या अशिलाच्या विरोधात आहेत, हे न्यायालयासमोर सांगितले. मी मांडलेली बाजू त्यांनी न्यायालयासमोर मान्य केली होती.