जळगाव - दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दबाव वाढल्यानंतर पाकिस्तानच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याच्यासह अन्य २३ दहशतवाद्यांविरोधात तेथील न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, हा प्रकार म्हणजे जगाच्या डोळ्यात होणारी निव्वळ धूळफेक आहे. पाकिस्तान फक्त कारवाईचे सोंग करत आहे, अशी टीका विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे.
पाकिस्तानच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईबाबत 'ई टीव्ही भारत'ने उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले, की आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दबाव वाढल्याने पाकिस्तान सरकारची कोंडी झाली आहे. दहशतवादाविरुद्ध आपण काहीतरी कारवाई करत आहोत, हे दाखविण्यासाठीच त्यांनी हाफिज सईद, अब्दुल मक्की, आमीर हमजा यांच्यासह २३ दहशतवाद्यांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केल्या. पण पाकिस्तान जगाला फसवत आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यासंदर्भात डेव्हिड हेडलीची साक्ष नोंदविण्यात आली होती. तेव्हा हेडलीने सईद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असून तो लष्कर-ए-तोयबा आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांसाठी काम करत असल्याचे सांगितले होते. एवढेच नव्हे तर २६/११ हल्ल्यावेळी भारताने जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याने देखील कबुली जबाबात सईद हा पाकिस्तानात असून तोच लष्कर-ए-तोयबा आणि अल कायदा या संघटना चालवत असल्याचे सांगितले होते. तसे पुरावे देखील भारताने पाकिस्तानला दिले होते. मात्र, आजवर पाकिस्तानने याप्रश्नी सईदवर कारवाई केलेली नाही.