जळगाव- शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे. खंडेराव नगरातील रमेश दगडू भोई (वय ३५, मूळ रा. नशिराबाद, ता. जळगाव) या तरुणाने नैराश्यातून रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेत काम शोधण्यासाठी जळगावात आलेल्या भिम मुन्ना राठोड (वय ३०, रा. उमऱ्या, ता. शिरपूर) या तरुणाने कौटुंबिक वादातून गळफास घेवून आत्महत्या केली.
जळगाव शहरातील खंडेराव नगरातील रहिवासी असलेला रमेश भोई हा जळगावात शेंगदाणे व फुटाणे विकण्याचे काम करत होता. कौटुंबिक वाद झाल्यामुळे त्याची पत्नी आशा ही मुलासह माहेरी निघून गेलेली आहे. पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर रमेश हा खंडेराव नगरात आई कमलाबाई, वडील दगडू भोई आणि भाचा अभिजित भोई यांच्यासोबत राहत होता. गेल्या चार ते पाच वर्षांपासून पत्नी माहेरी गेल्याने नैराश्येतून गुरुवारी (६ रोजी) रात्री १२ वाजेच्या सुमारास रमेश घराबाहेर पडला. आज, शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास जळगाव-शिरसोली दरम्यान रेल्वेखाली झोकून देत त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. जिल्हा वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला होता. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.