जळगाव- रेशन दुकानांवरून धान्य मिळण्यासाठी बुधवारी सकाळपासून शेकडो नागरिकांनी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. दुपारी 1च्या सुमारास 2 तरुण थेट तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या दालनात पोहोचले. त्यांनी हिंगे यांना शिवीगाळ करून गोंधळ घातला. या प्रकारामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
रेशनच्या धान्यासाठी तहसीलदारांना शिवीगाळ करून तरुणांनी घातला गोंधळ, पोलिसांनी घेतले ताब्यात - धान्य
रेशनच्या धान्यासाठी संतप्त झालेल्या तरुणांनी बुधवारी थेट तहसीलदार वैशाली हिंगे यांना शिवीगाळ केली. त्यामुळे पोलिसांनी तहसीलदार कार्यालयात येऊन शिवीगाळ करणाऱ्या 2 तरुणांना ताब्यात घेतले.
धान्य मिळवण्यासाठी नागरिकांची दररोज तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. तांत्रिक अडचणींमुळे धान्य मिळत नसल्याने नागरिकांचा प्रचंड संताप होत आहे. अशाच 2 संतप्त तरुणांनी बुधवारी थेट तहसीलदार वैशाली हिंगे यांना शिवीगाळ केली. या प्रकारामुळे हिंगे यांनी शहर पोलिसांना माहिती देऊन अतिरिक्त बंदोबस्त मागवला. पोलिसांनी तहसीलदार कार्यालयात येऊन गर्दी पांगवली. तसेच हिंगे यांना शिवीगाळ करणाऱ्या 2 तरुणांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तहसीलदार कार्यालयात सुरू असलेला गोंधळ पाहून एका तरुणाने मोबाईलमध्ये शुटिंग करून हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल केला.
तरुणांनाही झाली मारहाण?
तहसीलदार यांच्या कार्यालयात गोंधळ घालणाऱ्या दोन्ही तरुणांनी तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी, शिपाई यांनी लाकडी दांड्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. दोघांना खरच मारहाण झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे उपस्थित नागरिकदेखील संतापले होते. नंतर पोलिसांनी ही गर्दी पांगवली.