जळगाव -मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने उडवले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 4 फेब्रुवारी) सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या सामनेर गावात घडली. या घटनेत दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर धडक देणारा अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मनीषा साहेबराव पाटील (वय 50 वर्षे) आणि अनिता सहादू पाटील (वय 48 वर्षे, दोघी रा. सामनेर), अशी या अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.
अज्ञात वाहनाने दिली धडक
सामनेर हे गाव जळगाव-पाचोरा रस्त्यावर आहे. या गावातील अनेक स्त्री-पुरुष दररोज मॉर्निंग वॉकला जात असतात. मनीषा पाटील व अनिता पाटील या दोन्ही महिला देखील नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडल्या होत्या. त्या रस्त्यावर फिरत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वाहन चालक घटनास्थळावरून पसार
हा अपघात एवढा भीषण होता की एक महिला रस्त्याच्या बाजूला दूरपर्यंत फेकली गेली. तर दुसरी महिला साधारण 50 मीटर अंतरापर्यंत वाहनासोबत फरपटत गेली. या अपघातानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पलायन केले. ही घटना घडल्यानंतर दोन्ही महिलांचे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी पाचोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, पोलीस हवालदार रामदास चौधरी यांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा -25 वर्षे झाली 'या' गावात उधळला नाही ग्रामपंचायत निवडणुकीचा गुलाल, कारण..