महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना अमळनेर तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये घडली. मृत्यू पावलेली दोन्ही मुले ही लोंढवे गावातील रहिवासी होती.

Two school children drowned  in jalgaon
नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

By

Published : Aug 1, 2020, 4:41 PM IST

जळगाव -नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना अमळनेर तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये घडली. मृत्यू पावलेली दोन्ही मुले ही लोंढवे गावातील रहिवासी होती. ती इयत्ता दहावीत शिकत होती. भावेश बळीराम देसले (वय 15), हितेश सुनील पवार (वय 15) अशी मृतांची नावे आहेत.

अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारे भावेश देसले, हितेश पवार आणि जयवंत सुरेश पाटील हे तिघे मित्र शनिवारी जवळच असलेल्या नाल्यात पोहण्यासाठी गेले होते. पावसामुळे हा नाला तुडूंब भरून वाहत आहे. भावेश देसले आणि हितेश पवार हे दोन्ही 15 फूट खोल पाण्यात गेले आणि काही वेळातच ते बुडू लागले. दोन्ही मित्र बुडत असल्याचे पाहून जयंवत घाबरला. त्याने दोघांना वाचवण्यासाठी आरडाओरड केली. परंतु, जवळ कोणीच नसल्याने मदतीला कोणीही आले नाही.

यानंतर त्याने गावात धाव घेऊन दोघे मित्र पाण्यात बुडल्याची माहिती दिली. लगेच भावेश, हितेश यांच्या कुटुबीयांसह ग्रामस्थ त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, सरपंच कैलास खैरनार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते. नंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी नाल्यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. दोघांच्या कुटुंबीयांनी आपल्या काळजाच्या तुकड्यांना मृतावस्थेत पाहून तेथेच हंबरडा फोडला. या घटनेने गाव सुन्न झाले आहे.

पोहताना दोर तुटल्याने दोघे बुडाले-
भावेश, हितेश आणि जयवंत या तिघांपैकी भावेश याला चांगले पोहता येत होते. परंतु, मित्र हितेश याला पोहता येत नसल्याने त्याला दोर बांधून भावेश पोहण्याचे शिकवत होता. जयवंत हा काठावरच होता. त्यालाही दोघांनी पोहण्यासाठी येण्याचा आग्रह केला होता. परंतु त्याला पोहता येत नसल्याने तो नाल्यात उतरलाच नाही. काही वेळाने हितेशचा तोल जाऊ लागला. त्यात त्याला बांधलेला दोरही तुटला. त्यामुळे भावेशने त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. हितेश अधिक खोल पाण्यात गेल्याने त्याचा दम सुटून तो बुडाला. पोहता येत असून भावेशही पाण्यात बुडला आणि दोन्ही मित्रांचा करुण अंत झाला.

शोकाकूल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार-
भावेश आणि हितेश या दोन्ही मित्रांचे वडील शेतकरी असून, त्यांची घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. भावेश हा एकुलता एक मुलगा होता. तसेच त्याला एक बहिण आहे. तर हितेश हे तीन भाऊ असून तो घरात सर्वात मोठा होता. यामुळे या दोन्ही कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान, भावेश आणि हितेश यांचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छदेन करण्यात आले. शोकाकूल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details