जळगाव - भुसावळ येथील रेल्वे यार्डातील जुन्या शेडजवळ असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवरून मालगाडीचे दोन डबे घसरले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. क्रेनच्या मदतीने घसरलेले डबे पुन्हा रुळांवर ठेवण्यात आले असून वाहतूक व्यनस्थीत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भुसावळ रेल्वे यार्डात मालगाडीचे दोन डबे घसरले - railway ministry
मालगाडी नागपूरहून मुंबईकडे जाताना मालगाडीच्या एका डब्याचा एक्सल तुटल्याने रुळावरून डबे घसरले होते. मात्र, इतर प्रवासी रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर कोणत्याही स्वरुपाचा परिणाम झाला नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मालगाडी नागपूरहून मुंबईकडे जाताना मालगाडीच्या एका डब्याचा एक्सल तुटल्याने तो रुळावरून घसरला. त्यामुळे एक्सल तुटलेल्या डब्याच्या मागील डबा देखील घसरला. यार्डात गाडीचा वेग कमी असल्याने चालकाला लगेच या प्रकाराचा अंदाज आल्याने रेल्वे थांबवली. या घटनेनंतर रेल्वे अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि घसरलेले डबे पुन्हा रुळांवर ठेवण्याची तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात आली. घसरलेले डबे रुळावर ठेवण्यासाठी दोन क्रेनची वापरण्यात आले. अशाप्रकारे रेल्वेच्या आपत्कालीन यंत्रणेने दोन तासात वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, या घटनेमुळे यार्डातील अन्य मालगाड्यांची वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र, प्रवासी रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर कोणत्याही स्वरुपाचा परिणाम झाला नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.