जळगाव - नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा बजावल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने जळगावातील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप हजारे आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांना 'आंतरिक सुरक्षा सेवा पदक' जाहीर केले आहे. यामुळे जळगाव पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्रातील १ हजार १७२ पोलिसांना हे पदक मिळाले आहे.
जळगाव पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे 'आंतरिक सुरक्षा सेवा पदक' जाहीर - Police
राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी ही यादी जाहीर केली आहे. संदीप पाटील यांना गेल्या वर्षी देखील पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाले होते. नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना आतापर्यंत चार पदके मिळाली आहेत.
राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी ही यादी जाहीर केली आहे. संदीप पाटील यांना गेल्या वर्षी देखील पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाले होते. नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना आतापर्यंत चार पदके मिळाली आहेत. सहायक निरीक्षक संदीप हजारे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील सरुड-शाहूवाडी येथील रहिवासी आहेत. २०१० मध्ये ते महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाले. उपनिरीक्षकाच्या ट्रेनिंगनंतर त्यांनी २०१६ ते १९ पर्यंत नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात सेवा बजावली. नक्षली परिसरात पेट्रोलिंग, विविध उपाय योजना आणि सुरक्षेसाठी जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा बजावली. सलग तीन वर्षे काम केल्यावर गेल्या वर्षीच त्यांची जळगाव जिल्ह्यात बदली झाली.
तर पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील हे मूळचे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील आहेत. २०१४ मध्ये ते पोलीस दलात दाखल झाले. उपनिरीक्षक पदाचे ट्रेनिंग आटोपल्यावर त्यांची पहिलीच पोस्टिंग नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात झाली. २०१५ ते २०१८ असे तीन वर्षे त्यांनी खडतर सेवा बजावली. २०१८ मध्ये जळगाव जिल्ह्यात बदली झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात ते कार्यरत आहेत.