जळगाव -जिल्ह्यातील पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रात्रीच्या वेळी ऑक्सिजनचा साठा संपला होता. त्यामुळे ऑक्सिजन अभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. प्रशासनाकडून या घटनेसंदर्भात कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दरम्यान, ऑक्सिजनचा साठा संपल्यानंतर शहरातील काही खासगी रुग्णालयातून ऑक्सिजन उपलब्ध करण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पाचोरा शहरासह परिसरात कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढत असून, रुग्णसंख्येसह मृत्यू होणाऱ्यांचे वाढते प्रमाण अत्यंत भीतीदायक ठरत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातही कुटुंबच्या कुटुंब बाधित होत असल्याने सरकारी व खासगी रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रात्री (१ मे रोजी) ३० रुग्ण उपचार घेत असताना ऑक्सिजन संपल्याने प्रचंड खळबळ उडाली. त्यात महेश राठोड (वय ३२, रा. कुऱ्हाड बुद्रुक, ता. पाचोरा) व ग्यारसीबाई चव्हाण (वय ७६, रा. हनुमंतखेडा, ता. सोयगाव) या दोघांचा मृत्यू झाला. या दोघांचा मृत्यू हा ऑक्सिजन अभावी झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. या घटनेमुळे रुग्णालयातील उर्वरित रुग्ण व त्यांचे नातलग प्रचंड भयभीत झाले होते.