जळगाव :कोरोनासाठी उपाययोजना म्हणून शासनाने अधिग्रहित केलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य सेवेच्या व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाने दोन शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद गायकवाड व वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांचा समावेश आहे. या सोबतच कोरोना संशयित रुग्णांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यासाठी महापालिका दोन रुग्णवाहिका खरेदी करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जळगावात भेट दिली व जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी फडणवीस यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासंदर्भात रुग्णालयांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांचे व्यवस्थापन असावे, असे सुचविले. तसेच महापालिकेकडे केवळ एकच रुग्णवाहिका असल्याने रुग्णांना ने-आण करण्यासाठी प्रश्न उद्भवतात, असाही मुद्दा मांडला होता. या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकत्याच केलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिली.
दररोज १२०० तपासण्या :
जळगावात पाहिजे त्या प्रमाणात तपासण्या होत नाही व अहवाल लवकर येत नसल्याचे फडणवीस म्हणाले. पूर्वी अहवाल येण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, आता तपासण्यांचे प्रमाण वाढले असून दररोज जवळपास १ हजार २०० तपासण्या होत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यातील तपासण्यांचे प्रमाण पाहता सध्या ५ हजार ३६७ प्रति लक्ष असून ते गेल्या आठवड्यापर्यंत ४ हजार ३६१ पर्यंत होते. त्यात आता वाढ झाली असून ते ८ हजार प्रति लक्षापर्यंत नेण्याचे उद्दीष्ट असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.