जळगाव - कुत्र्याच्या अंगावर खुर्ची फेकल्याच्या क्षुल्लक कारणावरुन जळगाव शहराजवळ महामार्गावर असलेल्या एका हॉटेलात दोन गटात हाणामारी झाली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, जळगाव महापालिकेतील भाजपचे गटनेते भगत बालाणी, भाजपचे माजी नगरसेवक सुनील माळी यांचे भाऊ मुकेश माळी यांच्यासह जमावावर आज मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचा गुन्हा उशिरा फिर्याद दाखल झाल्याने आज दाखल झाला. या हाणामारीत एकाने पिस्तूल रोखल्याने खळबळ उडाली होती.
या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी त्यांचे साथीदार केदारनाथ वामन सानप, दुर्गेश ठाकूर, चौधरी यांचा वाहनचालक गोलू (सर्व रा. भुसावळ), यांच्यासह जळगाव महापालिकेतील भाजप गटनेते भगत रावलमल बालाणी हे सर्व जण रविवारी रात्री जळगाव-भुसावळ महामार्गावरील महिंद्रा हॉटेल येथे जेवणासाठी गेले होते. याचवेळी माजी नगरसेवक सुनील माळी यांचे भाऊ मुकेश दत्तात्रय माळी, छोटु पाटील व त्यांचे तीन मित्र देखील हॉटेलमध्ये बाजुच्या टेबलवर जेवण करीत होते. जेवण आटोपल्यानंतर अनिल चौधरी यांनी रिकामी खुर्ची कुत्र्याच्या अंगावर फेकली. या कारणावरुन चौधरी व माळी यांच्यात वाद झाला. शाब्दिक वाद टोकाला गेल्याने दोन्ही गटाकडील इतर साथीदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यात हाणामारी झाली.
पिस्तूल रोखल्याचे हॉटेलात उडाली खळबळ-
शाब्दिक वादाचे रुपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले. यावेळी केदारनाथ सानप याने कमरेला खोचलेली पिस्तूल बाहेर काढून समोरच्या लोकांवर रोखल्याने खळबळ उडाली. त्यानंतर काहीवेळाने दोन्ही गटांनी भांडण आपसात मिटवले. मात्र, घटनेच्या दुसऱ्या दिवशी हाणामारीत पिस्तूल रोखल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली.