जळगाव - पाझर तलावात बुडून दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उशिरा विटनेर येथे घडली. योगेश ज्ञानेश्वर वराडे (वय -20) आणि ज्ञानेश्वर दगडू ढमाले (वय 27) अशी मृतांची नावे आहेत.
जळगावात पाझर तलावात बुडून दोन मित्रांचा मृत्यू - विटनेर तलाव
पाझर तलावात बुडून दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उशिरा विटनेर येथे घडली. योगेश ज्ञानेश्वर वराडे (वय -20) आणि ज्ञानेश्वर दगडू ढमाले (वय 27) अशी मृतांची नावे आहेत.
योगेश वराडे हा ज्ञानेश्वरच्या शेतात फवारणीच्या कामासाठी गेला होता. फवारणीचे काम आटोपल्यानंतर सायंकाळी दोघे शेताच्या बाजूला असलेल्या पाझर तलावात हातपाय धुवायला गेले. त्यावेळी योगेशचा पाय घसरल्याने तो तलावाच्या पाण्यात पडला. पाण्यात गटांगळ्या खात असल्याने ज्ञानेश्वर योगेशला वाचवण्यासाठी गेला. मात्र, तलावात गाळ आणि खोल खड्डा असल्याने दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे दोघेही बुडाले. दोघांचा आवाज ऐकून जवळच असलेले दगडू ढमाले यांनी मदतीसाठी धाव घेतली. पण त्यांना वाचवण्यात यश आले नाही.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शिवदास चौधरी, बळीराम सपकाळे, सचिन देशमुख यांच्यासह विटनेरचे पोलीस पाटील साहेबराव धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर गावकऱ्यांच्या मदतीने पाझर तलावातून दोघांचे मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात आले.
योगेश आणि ज्ञानेश्वर हे दोघे जीवलग मित्र होते. दोघे नेहमी सोबत असायचे, असे गावकऱयांनी सांगितले. त्यांचा मृत्यू एकाच वेळी झाल्याने हळहळ व्यक्त केली होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.