जळगाव- भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि. 30 डिसें.) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास चाळीसगाव ते धुळे महामार्गावर असलेल्या दसेगाव फाट्यावर घडली.
धान्याची पोती वाहून नेणारा आयशर ट्रकला गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे पुढच्या बाजूचे नुकसान झाले आहे. पहाटेच्या वेळी चालकाला झोपेची डुलकी आल्याने हा अपघात घडल्याचे घटनास्थळावरील परिस्थिती पाहून लक्षात येत आहे. अपघातग्रस्त वाहने अडकून पडल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण तसेच मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.