जळगाव - उमाळा घाटात ट्रकने कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात आठ वर्षीय बालिकेसह दोन जण ठार झाले. शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नम्रता रामेश्वर चौधरी (8) आणि दिगंबर रामराव भोसले (40) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. मृत नम्रता हिचे वडील रामेश्वर रामराव चौधरी (35), आई अर्चना रामेश्वर चौधरी (32) आणि लहान भाऊ साई चौधरी (6) हे जखमी झाले आहेत.
आजीला भेटून घरी परतताना झाला अपघात -
अर्चना चौधरी यांच्या माहेरकडील नातेवाईक जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना पाहण्यासाठी चौधरी कुटुंबिय शनिवारी दुपारी मित्राच्या कारने (एमएच 19 बीयू 3918) जळगावात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत गावात राहणारे मित्र दिगंबर भोसलेदेखील जळगावात आले होते. उपचार घेणाऱ्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर सर्वजण घरी परत जाताना उमाळा घाटात त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने (एमएच 41 एयू 1807) जोरदार धडक दिली. या अपघातात नम्रता चौधरी व दिगंबर भोसले हे ठार झाले. तर कारमधील अन्य तिघे जखमी आहेत.