जळगाव - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना कक्षात संभाव्य कोरोना रुग्ण म्हणून दाखल असलेल्या दोघांचा 2 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या दोघांच्या कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हे अहवाल आज वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. दोघांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली होती. परंतु, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना कक्षात एक 65 वर्षीय महिला तसेच 32 वर्षीय तरूण संभाव्य कोरोना रुग्ण म्हणून उपचारासाठी दाखल झाले होते. दोघांचा शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मृत्यू झाला होता. यातील महिला ही खोटेनगर परिसरातील तर तरुण वाल्मिकनगरातील रहिवासी होता.