जळगाव - शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने आता दर आठवड्याला शनिवार तसेच रविवार असे दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात दूध, औषधे तसेच किराणा अशा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
जळगावात आता दर आठवड्याला दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात दररोज शेकडोंच्या संख्येने नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. जळगाव शहरात तर परिस्थिती खूपच गंभीर होत चालली आहे. त्यामुळे जळगाव शहर हे कोरोनाचे जिल्ह्यातील प्रमुख हॉटस्पॉट आहे. संपूर्ण जिल्ह्यात सद्यस्थितीत 25 हजार 93 रुग्ण आहेत. त्यापैकी सर्वाधिक 5 हजार 97 रुग्ण हे एकट्या जळगाव शहरात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, जळगाव शहरात आतापर्यंत 154 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनाच्या मृत्यूचा आकडा देखील जळगावात सर्वाधिक आहे. जळगाव शहरात 1 हजार 358 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस बिकट होत जाणारी परिस्थिती लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आता यापुढे जळगाव शहरात प्रत्येक आठवड्यात शनिवार तसेच रविवार असे दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन असणार आहे.
हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : जिल्ह्यातील 42 हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा परताव्याची प्रतीक्षा
यापूर्वी राज्य सरकारच्या निर्देशानुसार 4 जूनपासून जळगाव शहरातील बाजारपेठेतील मोठ्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने वगळून स्टँड अलोन दुकाने समविषम पद्धतीने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने 4 ऑगस्टपासून सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, ही परवानगी देताना आठवड्यातून मंगळवार, गुरुवार व शनिवारी दुकाने बंद ठेवण्याचे बंधन होते. या निर्णयावरही व्यापारी नाराज होते. त्यामुळे आता प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सलग सुरू राहतील. तर शनिवार व रविवार असे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
व्यापाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे बंधन-
प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस दुकाने उघडी करण्यात परवानगी दिली असली तरी महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे बंधन घालून दिले आहे. प्रत्येक दुकानदाराला फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, हँड सॅनिटायझरचा वापर, ट्रायल रूम बंद ठेवणे, दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहक येऊ न देणे, होम डिलिव्हरी, दुकानदार, कर्मचारी तसेच ग्राहकांनी मास्कचा वापर करणे, अशा प्रकारच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा -गणेशोत्सव; कोरोना काळात काढली मिरवणूक, गणेश मंडळावर गुन्हा दाखल