जळगाव- पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील यावल शहराजवळ, भुसावळ रस्त्यावरील हतनूर पाटचारीत घडली. दीपक जगदीश शिंपी (वय १३) व युवराज नीळकंठ दुसाने (वय १५) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. हे दोघे यावल शहरातील सुदर्शन चित्र मंदिर परिसरात असलेल्या सरस्वती विद्यामंदिर शाळेजवळ राहत होते.
मित्रांसोबत गेले होते पोहायला
दीपक व युवराज हे दोघे काल (बुधवारी) आपल्या मित्रांसोबत यावल-भुसावळ रस्त्यावरील हतनूर पाटबंधारे विभागाच्या पाटात पोहण्यासाठी गेलेले होते. सध्या या पाटचारीत शेती पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाटचारी पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे पाण्यात बुडाले. यावेळी त्यांच्या मित्रांनी बचावासाठी आरडाओरडा केला. पण तोपर्यंत दोघेही बुडाले होते.