महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंताजनक : जळगावात पुन्हा एकाच दिवशी कोरोनाचे 20 बळी

आज (गुरुवारी) जळगाव जिल्ह्यात 20 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या वाढून 1 हजार 868 इतकी झाली आहे. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात बळींची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 15, 2021, 10:41 PM IST

जळगाव -जिल्ह्यातील कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. काल (बुधवारी) एकाच दिवसात कोरोनामुळे तब्बल 21 रुग्णांचा बळी गेला होता. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज (गुरुवारी) देखील 20 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या वाढून 1 हजार 868 इतकी झाली आहे. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात बळींची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी (दि. 15 एप्रिल) 934 नवे बाधित रुग्ण समोर आले.

1 हजार 174 जण कोरोनामुक्त

जळगाव जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 934 नवे बाधित रुग्ण समोर आले. सलग दुसऱ्या दिवशी नव्या बाधितांचा आकडा एक हजारांच्या आत आला असून, हा दिलासा मानला जात आहे. समाधानाची बाब म्हणजे, गुरुवारी नव्या बाधितांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील 1 हजार 174 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. परंतु, दुसरीकडे कोरोनाच्या बळींची संख्या पाहिली तर परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे.

सक्रिय रुग्णसंख्या हजारांच्या पार

जळगाव जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येचा विचार केला तर ती चिंताजनक आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 11 हजार 329 सक्रिय रुग्ण आहेत. त्यात 7 हजार 965 रुग्णांना लक्षणे नाहीत तर 3 हजार 364 रुग्ण हे लक्षणे असणारे आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 87.56 टक्के तर डेथ रेट 1.77 टक्के आहे.

जळगाव शहराची स्थिती गंभीरच

जिल्ह्यात जळगाव शहर हे कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट आहे. गुरुवारी देखील जळगावात सर्वाधिक 220 नवे रुग्ण आढळले. जळगाव शहरापाठोपाठ सर्वच 15 तालुक्यांमध्ये संसर्ग वाढला आहे. सध्या जिल्ह्यात 1 हजार 507 रुग्ण ऑक्सिजन प्रणालीवर तर 774 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

हेही वाचा -जळगावमध्ये शिवभोजन थाळींची संख्या मर्यादित असल्याने गोरगरिब अडचणीत

ABOUT THE AUTHOR

...view details