महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

... म्हणून संभाजी भिडे बुद्धांना घाबरतात, त्यांची विचारसरणी विषारी -तुषार गांधी - संभाजी भिडे

महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आमचे जळगावचे प्रतिनिधी प्रशांत भदाणे यांनी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्याशी संवाद साधला.

तुषार गांधी

By

Published : Sep 30, 2019, 10:31 PM IST

Updated : Sep 30, 2019, 11:53 PM IST

जळगाव- द्वेषाचे राजकारण आणि त्याच्या प्रचारामुळे आपल्या देशात असहिष्णुता वाढत आहे. वाढत्या असहिष्णुतेचा आपल्या दैनंदिन जीवनावरही परिणाम दिसून येत आहे. हे सारे आपण होऊ दिले म्हणूनच घडले आहे. राजनिती ही आपल्या कमजोरीवर जगते आणि शक्तिशाली होते. आपण आपली कमजोरी ओळखायला पाहिजे आणि राजनिती आपण समजून घेतले पाहिजे, असे मत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

बोलताना तुषार गांधी

तुषार गांधी सोमवारी जळगावातील गांधीतीर्थ येथे आले होते. यावेळी 'ईटीव्ही भारत'ने त्यांच्याशी महात्मा गांधींची १५० वी जयंती, गांधी विचार, देशातील वाढती असहिष्णुता यासारख्या विषयांवर संवाद साधला. संवादात गांधींनी दिलखुलास मते मांडली. महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त बोलताना ते म्हणाले, अजरामर जीवनशैली, तत्वज्ञान किंवा मान्यता हे सदैव असायला हवे. आपल्या दैनंदिन जीवनात त्याचे महत्त्व हवे. त्यामुळे कोणत्या महापुरुषाची जयंती आहे किंवा कितवे जयंती वर्ष आहे, हे महत्त्वाचे नाही. अजरामर जीवनशैली किंवा तत्वज्ञानाचे आपल्या जीवनात प्रतिरूप केले आणि जीवन त्यापद्धतीने जगले तर ते जास्त महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

गांधी हा विस्तृत विचार

गांधी विचार हा खूप विस्तृत विचार आहे. आपल्या कौटुंबीक तसेच सार्वजनिक जीवनात तो खूप महत्त्वाचा ठरतो. गांधी विचार आणि आचरणाचे जीवनात खूप योगदान असते. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्याचा उपयोग होत असतो. आपल्या स्वतःतील गांधी शोधायचा, अशा प्रसंगातून प्रेरणा घेऊन त्याचा उजागर केला तर आपलेच नाही तर समाजाचे भलं होऊ शकते. आपल्या अस्तित्त्वावर जेव्हा धोका येतो तेव्हा महान लोकांची जीवनशैली तसेच विचारांची गरज भासते. प्रत्येकाने स्वतःतील गांधी, महावीर आणि बुद्ध ओळखायला हवा, तीच खरी शक्ती आहे, असेही गांधी म्हणाले.

गांधींचा पुरस्कार म्हणजे गरजेचे परिवर्तन

आज विविध राजकीय पक्ष महात्मा गांधींचा पुरस्कार करू लागले आहेत. मात्र, हे सारे सोयीनुसार होणारे गरजेचे परिवर्तन आहे. जे पक्ष गांधींचा पुरस्कार करतात, त्याच पक्षातील काही लोक गांधींचा तिरस्कारही करतात. एवढेच नव्हे तर ज्या पक्षातील लोक गांधींचा पुरस्कार करतात तेच लोक जेव्हा गांधींचा तिरस्कार होताना तेव्हा गप्प राहतात, याचे दुःख वाटते, अशी टीका देखील तुषार गांधींनी यावेळी भाजपचे नाव न घेता केली. गांधी आज राजकारणाची गरज झाले आहेत. मग ते काँग्रेस असो किंवा भाजप असो. राजकारणात जेव्हा सत्ता हवी असते तेव्हा गांधीं शिवाय पर्याय राहत नाही, असेही ते म्हणाले.

भिडेंच्या विचारधारेची कीव वाटते

भारताने जगाला बुद्ध दिला पण तो उपयोगाचा नाही, असे विधान करणाऱ्या संभाजी भिडेंविषयी देखील गांधींनी यावेळी मत मांडले. भिडे त्यांच्या समजुतीप्रमाणे बोलले. त्यांची विचारशैली विषारी आहे. त्यांना समाजात फाटाफूट करणे, द्वेष पसरवायचा आहे, म्हणून ते असे द्वेषाचे राजकारण करत असतात. द्वेषाच्या राजकारणामुळेच त्यांना बुद्ध तिरस्कृत वाटत आहेत. द्वेषाच्या राजकारणातील विषाला अमृत करण्याची शक्ती आजही बुद्धांच्या विचारसरणीत आहे. त्याला भिडे घाबरतात. बुद्धाचा द्वेष करून आपले महत्त्व दाखवायची गरज त्यांना भासली. भिडेंच्या अशा विचारधारेची कीव वाटते, असेही तुषार गांधी म्हणाले.

Last Updated : Sep 30, 2019, 11:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details