जळगाव- अमरावती येथून रेडिमेड कपड्यांचा माल घेऊन जळगावला येत असलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग लागली. या घटनेत कपड्यांचा माल तसेच ट्रक जळून खाक झाला आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान देखील झाले आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
अमरावती येथील सागर रोडवेज ट्रान्सपोर्ट कंपनीचा (एमएच 19 एक्स 632) ट्रक रेडिमेड कपड्यांचा माल घेवून जळगावला येत होता. रस्त्यात नशिराबाद गावाजवळ ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग लागली. ट्रकमध्ये कपड्यांचा माल असल्याने क्षणात आग भडकली. दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांनी ट्रकला आग लागल्याचे चालकाला सांगितले. तेव्हा चालकाने ट्रक थांबवून क्लिनरसह उड्या मारल्या. त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले होते. परंतु, तोपर्यंत ट्रक आणि माल जळून खाक झाला होता.