जळगाव- जिल्ह्यातील एरंडोल शहराजवळ ट्रक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळीत झालेल्या भीषण अपघातात काळी पिवळीतील 9 प्रवासी ठार झाले आहेत. तर अन्य 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात ठार झालेल्या 9 जणांपैकी 7 जणांची ओळख पटली आहे. तर अन्य दोघांची ओळख पटलेली नाही. स्टेअरिंग व्हीलचा एक्सेल तुटल्यामुळे अनियंत्रित झालेला ट्रक काळी पिवळीतील प्रवाशांवर काळ बनून आदळला. या अपघातात सुदैवाने एक 4 वर्षीय बालिका आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. दरम्यान, या भीषण अपघातानंतर अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एरंडोल शहराजवळ आज (सोमवारी) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. धुळ्याकडून भरधाव वेगाने येणारा (एम एच 15 जी 8474) क्रमांकाच्या ट्रकचा अचानक स्टेअरिंग व्हीलचा एक्सेल तुटल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला. हा ट्रक समोरून येणाऱ्या (एम एच 19 वाय 5207) क्रमांकाच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळीवर जोरात आदळला. या अपघातात काळी पिवळीतील तब्बल 9 प्रवासी ठार झाले. तर अन्य 11 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर रस्त्याच्या कडेला मृतदेहांचा अक्षरशः खच पडला होता. ट्रकची धडक एवढी भयंकर होती की त्यामुळे काळी पिवळीचा चुराडा झाला होता. ट्रकच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर अन्य वाहन चालकांनी आपली वाहने थांबवून मदतकार्य सुरू केले. काळी पिवळीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून त्यांना मिळेल त्या वाहनाने तत्काळ एरंडोल शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यानंतर गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात स्थळाचे दृश्य हृदय हेलवणारे होते.
अपघाताची माहिती मिळताच एरंडोल पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती. प्रवासी वाहतूक करणाऱ्या या काळी पिवळी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्याचे अपघातानंतर समोर आले आहे.
अपघातातील मृतांची नावे -
1) प्रसन्ना निवृत्ती वंजारी
2) निवृत्ती प्रभाकर वंजारी
3) परमेश्वर नाना जाधव
4) नितीन सोनार
5) काशिनाथ शंकर पाटील
6) उज्ज्वला निवृत्ती वंजारी
7) भानुदास माधव जाधव