जळगाव- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लागू केलेल्या संचारबंदीचा कामगारांना फटका बसला आहे. महानगरांमध्ये उपासमारीची झळ बसल्याने हजारो कामगार, मजुरांनी कडक उन्हात पायी घराचा रस्ता धरला. त्यांची हीच अडचण ओळखून ट्रक, कंटेनर अशा अवजड वाहन चालकांकडून मजुरांची आर्थिक लूटमार सुरू आहे. घरी जाण्यासाठी प्रतिमाणसी तीन ते साडेतीन हजार रुपये आकारल्या जात आहेत. ट्रक, कंटेनर चालक-मालकांचे यात मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा संसर्ग बळावण्याची भीती
मुंबई, पुणे, सूरतसह विविध शहरांमधून झारखंड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या आपल्या राज्यात जाण्यासाठी प्रति सीट तीन ते चार हजार रुपये देऊन हजारो कामगार, मजूर धोकादायक प्रवास करत आहेत. एकेका ट्रक आणि कंटेनरमध्ये 100 ते 125 जण अक्षरशः गुरांप्रमाणे कोंबून कोंबून भरले जात आहेत. एव्हढे पैसे मोजूनही वाहनांच्या कॅबिनवर देखील काही जण बसून प्रवास करत आहेत. कोरोनाचा उद्रेक पाहता सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. मात्र, ट्रकचालक पैसे कमविण्याच्या नादात नियम धाब्यावर बसवत आहेत. अशात कोरोनाचा संसर्ग बळावण्याची भीती आहे. कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे ‘लॉकडाऊन’ असल्याने परप्रांतीय मजुरांचे लोंढे ट्रक, कंटेनर, रिक्षा, टॅक्सी यासह मिळेल, त्या वाहनाने आपल्या राज्यात पोहोचत आहेत. अद्यापपर्यंत पोलिसांसह आरटीओनेही याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, यामध्ये ट्रक, कंटेनरचे अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या. यासह या प्रवासात ‘फिजिकल डिस्टन्स’सह नियमांचे पालन केले जात नसल्याने संसर्गाची भीती वाढली आहे.