महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तृतीयपंथी अंजलीची 'रिक्षा' सुसाट; ग्रामपंचायतवर झेंडा फडकवणारी पहिली तृतीयपंथी - Bhadali Budruk Gram Panchayat Election Update

जिल्ह्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीत एका तृतीयपंथीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अंजली पाटील (गुरू संजना जान) असे विजयी झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. त्यांनी 'रिक्षा' या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांची रिक्षा सुसाट धावली असून, प्रतिस्पर्धी उमेदवारांना त्यांनी मागे सोडले आहे.

भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत तृतीयपंथी उमेदवाराचा विजय
भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत तृतीयपंथी उमेदवाराचा विजय

By

Published : Jan 18, 2021, 3:48 PM IST

Updated : Jan 18, 2021, 3:56 PM IST

जळगाव -जिल्ह्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीत एका तृतीयपंथीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अंजली पाटील (गुरू संजना जान) असे विजयी झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. त्यांनी 'रिक्षा' या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांची रिक्षा सुसाट धावली असून, प्रतिस्पर्धी उमेदवारांना त्यांनी मागे सोडले आहे.

सुरुवातीला नाकारली होती उमेदवारी

भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंजली यांनी वॉर्ड क्रमांक 4 मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपली उमेदवारी दाखल केली होती. सुरुवातीला त्यांची उमेदवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नाकारली होती. मतदार यादीत तृतीयपंथी म्हणून त्यांच्या नावासमोर 'इतर' असा उल्लेख असल्याने त्यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपली उमेदवारी दाखल करता येणार नाही, असे कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले होते. या विरोधात अंजली यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्याठिकाणी न्यायालयाने त्यांना दिलासा देत उमेदवारी वैध ठरवली होती.

560 मते मिळाली

अंजली पाटील यांनी वॉर्ड क्रमांक 4 मधून निवडणूक लढवली. त्यांना 560 मते मिळाली आहेत. ग्रामस्थांच्या सुख-दुःखात साथ देणे, अडीअडचणीच्या वेळी मदतीला धावून जाणे, अशा स्वरुपाची त्यांची ओळख असल्याने त्यांना ग्रामस्थांनी उमेदवार म्हणून कौल दिला आहे. तृतीयपंथी उमेदवार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत असल्याने राज्यभर भादली बुद्रुक गावाची चर्चा झाली होती. अंजली पाटील यांनी उमेदवारीसाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर विजय देखील मिळवला. त्यामुळे भादलीची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे.

भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत तृतीयपंथी उमेदवाराचा विजय

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध- अंजली पाटील

ग्रामस्थांनी आपल्या पारड्यात भरभरून मते टाकल्याने आपला विजय झाला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. या पुढच्या काळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू, ग्रामस्थांना मूलभूत सोयीसुविधा मिळवून देऊ, अशी ग्वाही विजयी उमेदवार अंजली पाटील यांनी दिली आहे.

तृतीयपंथी समुदायासाठी सोन्याचा दिवस- शमिभा पाटील

तृतीयपंथी अंजली पाटील यांचा ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झाला आहे, ही बाब तृतीयपंथी समुदायासाठी अत्यंत महत्त्वाची असून, आजचा दिवस आमच्यासाठी सोन्याचा दिवस आहे. अंजली पाटील या भादली बुद्रुक गावाचा सर्वांगीण विकास करतील, अशी आम्हाला आशा असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या तथा अंजली पाटील यांच्या सहकारी शमिभा पाटील यांनी दिली आहे.

Last Updated : Jan 18, 2021, 3:56 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details