महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लॉकडाऊन'नंतर पहिल्याच दिवशी कोलमडले 'नो व्हेईकल झोन'चे नियोजन - नो व्हेईकल झोन जळगाव

आठवडाभराचा लॉकडाऊन उघडल्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होवू नये, म्हणून महापालिकेने २८ ठिकाणचे रस्ते बंद करून 'नो व्हेईकल झोन' तयार केले आहेत. मात्र, वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थाच न केल्याने नागरिकांनी आपली वाहने रस्त्यांवर जागा मिळेल तेथे उभी केल्याने नो व्हेईकल झोनचा बोजवारा उडाल्याचे चित्र आज जळगाव महापालिका हद्दीत दिसून आले.

jalgain photo
अस्थाव्यस्त लावलेली वाहने

By

Published : Jul 14, 2020, 7:47 PM IST

जळगाव -आठवडाभराचा लॉकडाऊन उघडल्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होवू नये, म्हणून महापालिकेने २८ ठिकाणचे रस्ते बंद करून 'नो व्हेईकल झोन' तयार केले आहेत. मात्र, वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थाच न केल्याने नागरिकांनी आपली वाहने रस्त्यांवर जागा मिळेल तेथे उभी केली. त्यामुळे बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यांवर मंगळवारी (दि. १४ जुलै) वाहतूककोंडी झाली होती.

सात दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर बाजारात गर्दी होईल, या अपेक्षेने जिल्हा व पालिका प्रशासनाने शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहनांना बंदी घातली. मात्र, घाईघाईने निर्णय घेताना या ठिकाणी येणारे नागरिक व व्यापारी आपली वाहने कोणत्या ठिकाणी उभी करतील? याचा विचार न केल्याने पालिकेचे 'नो व्हेईकल झोन'चे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून आले. एकाच भागात वाहने येवू नये, म्हणून पालिकेने २८ रस्ते पूर्णपणे सील केले. मात्र, सील केलेल्या रस्त्यांच्या बाहेरच नागरिकांनी वाहने उभी करत वाहतूककोंडीला हातभार लावला.

२८ ठिकाणचे रस्ते केले बंद

महापालिकेने शहरातील मुख्य बाजारपेठेत येणारे २८ रस्ते पूर्णपणे बंद केले. यामध्ये टॉवर चौक ते भिलपुरा चौक दरम्यानचा ५०० मीटरचा रस्ता पूर्णपणे अडवला आहे. यासह या रस्त्यावर बळीराम पेठ, शनिपेठ भागाकडून येणारे ७ रस्ते देखील सील करण्यात आले होते. टॉवर चौक ते चित्रा चौक दरम्यानचा ३०० मीटरचा रस्ता देखील पालिकेने सील केला आहे. तसेच नवीपेठेतील छोट्या-छोट्या गल्लीबोळातून थेट बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर येणारे रस्ते देखील पालिकेने बंद केले. त्यामुळे या ३०० मीटरच्या रस्त्यावर एकही वाहनाला प्रवेश देण्यात येत नव्हता. चौबे शाळेकडे बळीराम पेठ भागाकडून येणारा रस्ता बंद करून, थेट राजकमल टॉकीजपर्यंतचा रस्ता देखील सील करण्यात आला होता. या रस्त्यालगत बोहरा गल्लीकडे, सराफ बाजारकडे जाणारे रस्ते देखील सील केल्यामुळे नागरिकांना जुन्या जळगाव परिसरातून बोहरा गल्ली व सराफ बाजारात जावे लागले.

रस्ताच मिळेना, नागरिकही संभ्रमात

मनपाने २८ रस्ते सील केल्यामुळे मुख्य बाजारात जाण्यासाठी रस्तेच उपलब्ध नव्हते. त्यामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली. विशेष म्हणजे, बळीराम पेठ, शनिपेठ भागाकडील नागरिकांना शहरात येण्यासाठी रस्ता शिल्लक नसल्याने भिलपुरा चौकातून जुने जळगाव, नेरी नाकामार्गे फिरून यावे लागत होते. तर ममुराबाद, चोपडा, यावलकडून येणाऱ्यांनाही याच मार्गाने शहरात यावे लागत आहे.

जिल्हा परिषद चौक व नवीपेठेत प्रचंड वाहतूककोंडी

भिलपुरा चौकातील रस्ता बंद असल्याने जिल्हा परिषद जवळील पत्रे हनुमान मंदिराकडून नागरिक आपली वाहने आणत होते. मात्र, याठिकाणी रस्ता अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यासह नवीपेठेत इच्छापुर्ती गणेश मंदिराजवळ देखील वाहतूक कोंडीमुळे रस्ता पूर्णपणे जाम झाला होता.

आमदार, उपायुक्तांनी केली पाहणी

नवीपेठेत प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यानंतर काही नागरिकांनी आमदार सुरेश भोळे यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यानंतर काही वेळात आमदार सुरेश भोळे व पालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांनी नवीपेठेत जावून प्रत्यक्ष पाहणी केली. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने आमदार व उपायुक्तांनीच वाहनधारकांना सूचना देत वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर आमदारांच्या सुचनेनंतर नवीपेठेकडे जाणारा सील केलेला मार्ग उघडण्यात आला. यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details