जळगाव- शासनाने सीसीआय आणि राज्य कापूस पणन महासंघामार्फत राज्यात कापूस खरेदीची तयारी दर्शवली आहे. परंतु, काही जाचक अटी व शर्तींचे कारण पुढे करत राज्यभरातील जिनिंग उद्योजक अद्यापही कापूस खरेदीबाबत अनुकूल नाहीत. एकीकडे अशी परिस्थिती असताना जळगाव जिल्ह्यातील जिनिंग उद्योजकांनी मात्र कापूस खरेदीबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील काही जिनिंगमध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली.
कापूस खरेदीसाठी जळगावातील जिनिंग उद्योजक सकारात्मक; शेतकऱ्यांना मोठा दिलासा - जळगाव संचारबंदी
एकीकडे अशी परिस्थिती असताना जळगाव जिल्ह्यातील जिनिंग उद्योजकांनी मात्र कापूस खरेदीबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील काही जिनिंगमध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली.
कोरोनामुळे अर्थकारण ठप्प झाल्याने कापूस प्रक्रिया उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. आजही अनेक शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर कापूस पडून आहे. हा कापूस शासनाने खरेदी करावा अशी मागणी सातत्याने केली जात असल्याने आता पणन महासंघातर्फे कापसाच्या खरेदीच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, अद्यापही जिनिंग उद्योजक कापूस खरेदीसाठी अनुकूल नाहीत. आधीच्या करारानुसार कापूस खरेदी होणार नाही. संभाव्य तोटा पाहून अटी व शर्ती शिथील करण्याची मागणी जिनिंग उद्योजकांनी केली आहे. अशा परिस्थितीत आधीच्या कारखान्यांनी कापूस खरेदी नकार दिल्यास नव्या जिनिंगला खरेदीस परवानगी देण्याची तयारी महासंघाने ठेवली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील काही जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरू झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कार्यवाही झाली आहे, अशी माहिती खान्देश जिनिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी सांगितले.
दरम्यान, रुई आणि सरकीत घट आली आहे. त्यामुळे उतारा कमी झाल्याने त्याचा फटका जिनिंगवाल्यांना बसतो. म्हणून शासनाने नव्या अटी शर्तीत बदल करायला हवा, अशी जिनिंग उद्योजकांची प्रमुख मागणी आहे. सीसीआय आणि पणन महासंघाने आधीच्या नियमात बदल करण्यास असमर्थता दर्शवल्याने जिनिंग उद्योजक आणि शासनात कापूस खरेदीच्या मुद्द्यावरून एकमत होऊ शकलेले नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असेही प्रदीप जैन म्हणाले.