जळगाव - गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वदूर कुठे संततधार तर कुठे मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला आहे. धरणांमध्येही पाणीसाठा वाढू लागला आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आल्याने जामनेर तालुक्यातील भराडी आणि सवतखेडा या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. दोन्ही गावातील ग्रामस्थांची शेती नदीच्या आजूबाजूच्या काठांवर असल्याने ग्रामस्थ जीव धोक्यात घालून वाहत्या नदीतून ये-जा करत आहेत. अशा प्रकारामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे.
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस; वाघूर नदीला पूर आल्याने दोन गावांचा तुटला संपर्क - दोन गावांचा तुटला संपर्क
जळगाव जिल्ह्यात वाघूर नदीला पूर आल्याने जामनेर तालुक्यातील भराडी आणि सवतखेडा या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. दोन्ही गावातील ग्रामस्थांची शेती नदीच्या आजूबाजूच्या काठांवर असल्याने ग्रामस्थ जीव धोक्यात घालून वाहत्या नदीतून ये-जा करत आहेत. अशा प्रकारामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस खरीप हंगामातील कापूस, मका, सोयाबीन पिकांसाठी फायदेशीर असला तरी उडीद, मूग तसेच चवळी अशा कडधान्यवर्गीय पिकांसाठी मात्र, नुकसानदायी ठरला आहे. आठवडाभरापासून पाऊस सुरू असून, सूर्यदर्शन झालेले नाही. त्यामुळे कडधान्य पिके शेतातच सडू लागली आहेत. उडीद, मुगाच्या शेंगांना कोंब फुटू लागले आहेत. काही ठिकाणी शेंगांना बुरशी लागली आहे. सततच्या पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. विविध सिंचन प्रकल्प देखील भरत आहेत. जळगाव शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या वाघूर धरणात पाणीसाठा वाढला आहे. सद्यस्थितीत वाघूरमध्ये 87.5 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील 13 पैकी 7 मध्यम सिंचन प्रकल्प तुडुंब भरले असून, उर्वरित प्रकल्प देखील येत्या काही दिवसात 100 टक्के भरतील, अशी स्थिती आहे.
भराडी-सवतखेडा गावांचा संपर्क तुटला-गावातून बाहेर जाण्यास अन्य रस्ता उपलब्ध नसल्याने नदीच्या खोल पाण्यातून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ जामनेर तालुक्यातील भराडी गावाच्या ग्रामस्थांवर आली आहे. जिल्ह्यात वरुणराजाने कृपा केल्याने नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. जामनेर तालुक्यातील प्रमुख नदी असलेल्या वाघूर नदीला पूर आला आहे. त्यामुळे भराडी आणि सवतखेडा या दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. या दोन्ही गावात आणि परिसरातील शेती शिवारात जाण्यासाठी ग्रामस्थांना वाघूर नदीतूनच ये-जा करावी लागत आहे. गेल्या 15 दिवसांपासून नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. भराडी आणि सवतखेडा गावात राहणाऱ्या ग्रामस्थांना आपल्या शेत शिवारात जाण्यासाठी अन्य रस्ताच नाही. अशा परिस्थितीत वाघूर नदीतून कमरे एवढ्या खोल पाण्यातून, जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना ये-जा करावी लागत आहे. वाघूर नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी या गावातील ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु, अद्यापही याठिकाणी पूल बांधण्यात आलेला नाही. शासनाने ही अडचण लक्षात घेऊन वाघूर नदीवर पूल बांधावा, अशी मागणी करण्यात आली आहे.