जळगाव- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (शनिवार)जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दोघांचाही पहिलाच जळगाव दौरा आहे. यावेळी जळगावमध्ये शेतकरी मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. हे दोन्ही नेते शेतकऱ्यांना यावेळी संबोधित करणार आहेत.
या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकरी प्रश्नांसह जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या घोषणेची अपेक्षा जिल्ह्यावासीयांकडून व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने मुक्ताईनगर येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी जळगाव येथे जैन हिल्सवर दुपारी १२ वाजता होणाऱ्या पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी देखील हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. ठाकरे व पवार यांच्यासोबतच कृषीमंत्री दादा भुसे व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंदूरबार येथे पालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटनांसाठी येत आहे. जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेला शहराच्या विकासासाठी नगरोथ्थान योजनेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तन होवून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार आले. त्यानंतर जळगाव महापलिकेला मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती देण्यात आली आहे. या निधीची स्थगिती उठवून महापालिकेच्या आणखी २० कोटी रुपयांच्या कामांना मुदतवाढ देण्यासाठी महापालिकेचे पदाधिकारी उद्या मुख्यमंत्री ठाकरे यांना साकडे घालणार आहेत. यावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे. यासह जिल्ह्यातील गिरणेवरील ७ बलून बंधारे, पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प, शेळगाव बॅरेज प्रकल्प, भागपूर उपसा सिंचन योजना या रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना देखील मुख्यमंत्री व महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून चालना मिळावी, अशी अपेक्षा आहे.